Breaking News

राखीच्या रेशमी धाग्यातून श्‍वेता महाले यांनी जपले 40 हजार भांवांशी ऋणानुबंध!

बुलडाणा, दि. 08 - सण आणि उत्सवातून संस्कृतीच्या संवर्धनासह सामाजिक बांधिलकी देखील जोपासली जाते. विशेषत : भेदभावाच्या भिंती दूर सारुन सामाजिक एकोपा अधिक दृढ करण्यासाठी आपल्या पारंपारिक सणांची उपयुक्तता फार मोठी असल्याचे जि.प.सभापती श्‍वेता महाले  यांनी त्यांच्या अनोख्या उपक्रमातून दाखवून दिले आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने तब्बल 40 हजार भावांना राखी पाठवून श्‍वेताताईंनी राजकारणाच्याही पलिकडे आपली कार्यकक्षा रूंदावली असेच म्हणावे लागेल.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले यांनी मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. चिखली मतदार संघातील सर्व जाती धर्मातील बंधूंना त्या राख्या पाठवत असतात. तलम रेशमी धाग्याच्या आकर्षक राखीसोबत आपले मनोगत व्यक्त करणारे एक पत्र देखील श्‍वेताताई पाठवतात. या वर्षीच्या पत्रात त्यांनी उंद्री गटातून जिल्हा परिषद निवडणूकीत मिळालेला विजय व त्या पाठोपाठ सभापती पदाची आलेली जबाबदारी या दोन्ही साठी सर्व सहकारी, वरिष्ठ व मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या शिवाय  बेटी बचाओ, बेटी पढाओ  हा विषय श्‍वेताताईंनी मोठ्या आपुलकीने मांडला आहे. आदर्श.आंगणवाड्या व महिलांसाठी रोजगार निर्मिती हे आपले संकल्प असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या पत्राद्वारे भाऊ- बहिनीच्या नात्याला उजाळा देतांना बहिनीच्या हाकेला साद घालत भाऊ नक्कीच धावत येईल असा विश्‍वास श्‍वेताताई महाले यांनी व्यक्त केला आहे. राजकारण आणि समाजकारण ह्या एकाच.नाण्याच्या दोन बाजू असल्याची जाण राजकारणात फार कमी जणांना असते. अशी जाण असणार्‍या  श्‍वेताताईंनी आपला सामाजिक संपर्क अधिक व्यापक करण्यासाठी रक्षा बंधनाचे औचित्य साधून त्याद्वारे सकारात्मक संदेश. समाजात पोहचवला आहे. सर्व जाती- धर्मीयांसह गरीब, श्रीमंत, शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, व्यापारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते.अश्या तब्बल 40 हजार भावांना एका सूत्रात बांधणार्‍या या बहिनीच्या अनोख्या उपक्रमातून भाऊ-बहिनीच्या निरामय नात्याला सामाजिक सौहार्दाची रुपेरी किनार लाभली आहे.
विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्‍वेताताईंनी पाठवलेली राखी मिळाल्यानंतर व सोबतचे पत्र वाचल्यानंतर अनेक जण भावूक झाले. विशेषत : ज्यांना सख्खी बहिन नाही अशा अनेक भावांचा गहिवर राखी मिळताच दाटून.आला. कित्येकांनी आपले भावनिक अभिप्राय व्यक्त करून प्रतिसाद दिला. एकूणच या अनोख्या उपक्रमातून श्‍वेताताई महाले पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचे ऋणानुबंध खर्‍या अर्थाने जपले असेच म्हणावे लागेल.