Breaking News

कृष्णा आनंद इण्डेन गॅस एजन्सीकडून ग्राहकांची होत आहे आर्थिक पिळवणूक

बुलडाणा, दि. 20 - अंढेरा येथे देऊळगाव राजा येथील कृष्णा आनंद इण्डेन एजन्सीकडून सिलेंडर पुरवठा होतो. सदर एजन्सीच्या त्रासाला अंढेरा व परिसरातील  गावातील नागरिक कंटाळले आहेत. या प्रकरणी एमआयएमआयएम देऊळगाव राजा पार्टीच्या वतीने 17 जुलै रोजी तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन  देण्यात आले. 
अंढेरा येथे दर गुरुवारी अंढेरा गावासह शिवणी आरमाळ, मेंडगाव, बायगांव, पाडळी शिंदे, पिंप्री आंधळे या गावांना सिलेंडर वितरीत होते. सिलेंडर मिळण्यासाठी  ग्राहक सकाळी 6 वाजेपासून श्री औंढेश्‍वर विद्यालयासमोर रांगेमध्ये सिलेंडर लावतात. गॅसची गाडी आल्यानंतर एजन्सी मालक दोन तास फोनवर विचारणा करतात व  किती दिवस झाले याची चौकशी करतात. सदर गाडी 70 ते 80 सिलेंडर घेवून यचेते. रांगेमध्ये 100 ते 120 सिलेंडर असतात. गॅस वितरित करताना ग्राहकांना  पावती दिली जात नाही. तसेच सिलेंडरचे वजनसुद्धा करुन दिले जात नाही. ज्या ग्राहकाने पावती मागितली त्यास सिलेंडर मिळणार नाही, अशी धमकी दिली जाते.  पावती देत नसल्याने ग्राहकांकडून अधिकचे पैसे वसूल केले जातात. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून सदर गॅस  एजन्सीवर योग्य कार्यवाही करावी. याविषयी अनेक वेळा ग्राहकांनी तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या दिल्या परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची  कार्यवाही झाली नाही. म्हणून मा.जिल्हाधिकारी यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून अंढेरासह परिसरातील ग्राहकांना पावतीसह वजन करुन सिलेंडर मिळावे व  सदर गॅस एजन्सीवर कायदेशीर कार्यवाही करुन ग्राहकांना संरक्षण द्यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अनेक ग्राहक सबसिडीपासून वंचित
ग्राहकांकडून जादा पैसे घेवून गॅस मालक पावती शिवाय सिलेंडर वितरीत करतात. यावेळी ग्राहकांना तुमच्या खात्यात 200 ते 300 रुपये सबसिडी जमा होणार  असल्याचे सांगितले जाते. मात्र कित्येक दिवस झाले तरी ग्राहकांच्या खात्यात एक रुपयासुद्धा जमा होत नाही. ग्राहक बँकेत गेल्यास त्यांना पावती मागतल्या जाते.  परंतु पावती नसल्यामुळे ग्राहक सबसिडीपासून वंचित राहतात. आता सर्वच व्यवहार हे ऑनलाईन झाल्यामुळे ग्राहकांची सबसिडी खात्यात जमा व्हायला पाहिजे, परंतु  तसे न होता शासनाच्या लाखे रुपये सबसिडीपासून ग्राहकांना वंचित राहावे लागत आहे.