Breaking News

गिरणी कामगारांचा एक ऑगस्टला मुंबईत महामोर्चा

रत्नागिरी, दि. 20, जुलै - गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्‍नावर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला पुन्हा जागे करण्याची वेळ आली आहे. वर्षाला दोन हजार घरे या  कूर्मगतीने सरकार व यंत्रणेची वाटचाल सुरू राहिल्यास कामगाराला घर मिळेपर्यंत 2070 साल उजाडेल. त्यासाठीच सरकारला जागे करण्यासाठी येत्या 1 ऑगस्टला  विधान भवनावर महामोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती कामगार नेते व गिरणी कामगार कृती समितीचे गोविंवदराव मोहिते यांनी चिपळूण येथील बैठकीत व्यक्त  केले. 
चिपळूणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये गिरणी कामगारांची सभा झाली. 1 ऑगस्टला गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन  करून मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी रायगडपासून तळकोकणापर्यंत कृती समितीतर्फे जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्याचाच  एक भाग म्हणून चिपळूणला सभा झाली. त्यावेळी श्री. मोहिते म्हणाले, घर मिळणे हा गिरणी कामगाराचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच. गिरणी कामगारांना घरे  देण्याचा कायदा काँग्रेस सरकारने केला. त्यानुसार पहिल्याच टप्प्यात 6,923 घरांचे वितरण झाले. भाजप सरकारने दोनवेळा सोडत काढून 5,510 घरांचे वाटप केले.  आता मुख्यमंत्र्यांनी 7,700 घरे कामगारांना देण्याची घोषणा केली. अर्ज भरलेले सर्व गिरणी कामगार वा त्यांच्या वारसांना घरे केव्हा मिळणार, याचा आराखडा  सरकारने अजून तयार केलेला नाही. गिरणी कामगारांना घर देण्याचा कायदा अमलात येण्यासाठी घरे बांधण्याची योजना त्वरित कार्यान्वित होण्यासाठी व अल्प  कालावधीत ही घरे मिळण्यासाठी विधान भवनावर महामोर्चा काढला जाणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने घरे कशी बांधायची, तसेच इतर काही उपाययोजनाही आम्ही  सुचवू शकतो. त्यानुसार मुंबईतील काही मोकळ्या जागांचा वापर यासाठी सरकार करू शकते, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे कामगारांसाठी करण्यात येत असलेल्या कामांसंदर्भातील कार्य आढावा अण्णा शिर्सेकर यांनी घेतला. ऑनलाइन अर्जामध्ये ज्यांना कुणाला  अडचणी आहेत त्यांना स्थानिक ठिकाणी तसेच मुंबईतील परळ येथे संघाच्या कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कामगार, त्यांचे  नातेवाईक यांनी मोठ्या संख्येने आपल्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन दत्ता इस्वलकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नागिरी जिल्हाप्रमुख मनोहर जाडे यांनी केले. उत्तर रत्नागिरीतील सुमारे तीनशे गिरणी कामगार या बैठकीला उपस्थित होते.