Breaking News

अनैतिक संबंधातून खूनप्रकरणी एकास जन्मठेप, तर अन्य एकास कारावास

सांगली, दि. 20, जुलै - पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून जत तालुक्यातील मौजे तिकोंडी येथील सुरेश विठ्ठल हिंचगिरी (वय 32) याचा खून  केल्याप्रकरणी रामगोंडा शिवगोंडा अमृतट्टी (वय 28) याला येथील सांगली जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी बुधवारी जन्मठेप व दहा हजार  रूपये दंडाची शिक्षा सुनावली, तर सहआरोपी कांतेश आमगोंडा वाडेद (वय 21) याला दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.
जत तालुक्यातील मौजे तिकोंडी येथे राहणा-या सुरेश हिंचगिरी याचे मित्र असलेल्या रामगोंडा अमृतट्टी याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्यातून या दोघात वारंवार  भांडणेही होत होती. या रागातूनच रामगोंडा अमृतट्टी याने दि. 11 सप्टेंबर 2013 रोजी सुरेश हिंचगिरी याला गोड बोलून घरातून घेऊन जाऊन मौजे तिंकोडी  गावानजीकच्या ओढ्यालगत कुर्हाडीचे घाव घालून खून केला होता. त्यानंतर भाचा कांतेश वाडेद याच्या मदतीने सुरेश हिंचगिरी याचा मृतदेह एका पोत्यात घालून तो  अथणीजवळील नदीत नेऊन टाकला होता. दरम्यान, मदगोंडा हिंचगिरी यांनी उमदी पोलिस ठाण्यात सुरेश हिंचगिरी हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती व  आरोपी रामगोंडा अमृतट्टी याच्याविरोधात संशय व्यक्त केला होता.
या तक्रारीआधारे जत येथील तत्कालीन पोलिस उपअधिक्षक पौर्णिमा चौगुले यांनी तपास करून खुनाची ही घटना उघडकीस आणली होती. या खूनप्रकरणी रामगोंडा  अमृतट्टी व कांतेश वाडेद या दोघांना अटक करून त्यांच्याविरोधात सांगली येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात  सरकार पक्षाच्यावतीने 17 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी, पंच व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या खटल्यात सरकार  पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती स्मिता शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना या खटल्याकामी उमदी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक मोहिद्दीन  मुजावर, वंदना मिसाळ, रमा डांगे व सुप्रिया भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.