Breaking News

पेठला बालगृहातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक, दि. 20, जुलै - नाशिक जिल्ह्यात पेठ येथील मुलींच्या बालगृहात अल्पवयीन मुलीवर अध्यक्षाच्या मुलानेच वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार  काल (18 जुलै) उघडकीस आला. पिडीत मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिची नाशिक शहरातील नासर्डी पुलावरील मुलींचे शासकीय अनुरक्षण गृहात बदली झाल्यानंतर  मुलीने या प्रकाराबाबत अधीक्षकांना सांगितले. 
मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणानंतर नाशिकच्या शासकीय अनुरक्षण गृहातील अधिक्षकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित अतुल शंकर अलबाड  याच्याविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठ येथे नाशिक जिल्हा आदिवासी महिला हक्क संरक्षण समिती पेठ संचलित मुलींचे बालगृह  आहे. या बालगृहात 2013 मध्ये अनाथ म्हणून पीडित विद्यार्थिनी भरती झाली होती. दोन वर्षांनंतर बालगृहाच्या अध्यक्षांचा मुलगा अतुल याने 2015 मध्ये दिवाळी  असताना पिडीत मुलीवर अत्याचार केले.
याबाबत पिडीत मुलीने बालगृहाच्या अध्यक्षा सुशीला अलबाड यांना सांगितले. मात्र, अलबाड यांनी तूच माझ्या मुलाच्या मागे लागल्याचा आरोप करीत दुर्लक्ष केल्याचा  आरोप पिडीतेने केला आहे. त्यानंतर संशयित अतुल याने वारंवार अत्याचार केला. पीडित मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिला बुधवारी (दि.12 जुलै) नासर्डी पूल येथील  मुलींचे शासकीय अनुरक्षण गृहात दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील अधीक्षक एस. डी. गांगुर्डे यांच्याकडे पीडितेने सर्व घटना सांगितली. त्यानंतर हा धक्कादायक  प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित अतुल अलबाड याच्याविरोधात पोस्को कायद्यान्वये बलात्काराची फिर्याद दाखल  केली आहे. हा गुन्हा पेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारानंतर बालगृहाच्या अध्यक्षांची आत्महत्येची धमकी दिली आहे. पीडित मुलीने गांगुर्डे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.  तसेच, शनिवारी (दि.15) मुलीचा दाखला मागवण्यासाठी बालगृहाच्या अध्यक्षांना फोन करण्यात आलवेळी अध्यक्षा सुशीला अलबाड यांनी दाखल्याविषयी न बोलता  गुन्हा दाखल झाला तर मी तुमची नावे लिहून आत्महत्या करेल, अशी धमकी दिल्याचा लेखी अहवाल मुलींचे शासकीय अनुरक्षण गृहाचे अधीक्षक गांगुर्डे यांनी मुंबई  नाका पोलीस आणि जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांना दिला आहे.