Breaking News

थकबाकीदार दीड हजार ग्रामपंचायतीचे पाणी तोडले

औरंगाबाद, दि. 20, जुलै - ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मूळ थकबाकी रक्कम भरून व्याज व दंड माफ करण्याची योजना जाहीर केली होती, मात्र  ग्रामपंचायतींनी या योजनेचा फायदा उचलला नाही. त्यामुळे महावितरणने थकबाकी असलेल्या 1485 ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनांचे वीज कनेक्शन तोडले  आहे,’ अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी (18 जुलै) दिली. गणेशकर म्हणाले, ‘जिल्हयातील नगरपरिषदा तसेच नगरपालिका  यामध्ये पथदिव्याच्या वीज बिलापोटी 25 कोटी 24 लाख रुपये थकीत आहे. मंगळवारी पथदिव्यांचे वीज कनेक्शन कट करण्याची कारवाई महावितरण  कार्यालयाकडून करण्यात आली. या कारवाईअंतर्गत कन्नड, वैजापूर, सिल्लोड अशा नगर पालिकेच्या पथदिव्यांचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला. शासकीय  कार्यालये, निवासस्थानांना सप्टेंबर महिन्यात प्रीपेड वीज मीटर बसविण्यात येईल. शासकीय कार्यालयाच्या कर्मचार्यांची बदली झाल्यानंतर थकीत वीज बिल वसूल  करण्यातअडचणी येतात. वसुलीसाठी तगादा लावाला लागतो. वीज बिलाची थकीत रक्कम वाढते. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव  महामंडळाकडे पाठविला आहे. प्रीपेड मीटरची ऑर्डरही दिली आहे. या मीटरमुळे अगोदर पैसे भरावे लागतील. त्यानंतरच वीज पुरवठा सुरू होणार आहे. सध्या  ऑनलाइन वीज बिल भरणा करण्याचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद परिमंडळातील सात लाख ग्राहकांपैकी 81 हजार ग्राहक ऑनलाइन बिल भरतात. इतरांनीही हा  पर्याय स्वीकारावा यासाठी प्रयत्न करू. थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी सहा विशेष पथके तयार केली आहेत.