Breaking News

कोविंद यांचे प्रणव मुखर्जी , पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांकडून अभिनंदन

नवी दिल्ली, दि. 21, जुलै - मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी ट्विटच्या माध्यमातून नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ  कोविंद यांचे अभिनंदन केले आहे.
देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून निवडून आल्याबद्दल रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा असे ट्विट मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविंद यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन. मी त्यांना  राष्ट्रपतीपदाच्या प्रेरणादायी व फलदायी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. कोविंद यांना मिळालेल्या जोरदार पाठिंब्याने आनंदीत झालो आहे. कोविंद यांना पाठिंबा  दिलेल्या सर्वांचे आभार. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीना कुमार यांनी प्रचारादरम्यान लोकशाही मुल्य व तत्वांवरील आपला आदर दाखवून दिला आहे. त्याबद्दल  त्यांचेही अभिनंदन.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही ट्विटच्या माध्यमातून कोविंद यांचे अभिनंदन केले आहे. रामनाथ कोविंद यांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांचा  विजय खरोखरीच ऐतिहासिक आहे. ते या देशाचे आदर्श राष्ट्रपती ठरतील याची मला खात्री आहे. त्यांचा विजय हा गरीब, दुर्लक्षितांच्या आकांक्षांचा विजय आहे.  कोविंद यांना पाठिंबा देणा-या सर्वांचे आभार, असे ट्विट शाह यांनी केले आहे.