Breaking News

संयुक्त राष्ट्र संघानेही पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करावे - सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली, दि. 21, जुलै - अमेरिकेप्रमाणेच संयुक्त राष्ट्र संघानेही पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रयस्थान देणारा देश घोषित करावे, अशी मागणी भाजपचे खा.  सुब्रमण्यम स्वामी यांनी आज येथे केली. आता अमेरिकेने पाकिस्तानवर आर्थिक निर्बंधही लागू करावेत, असेही खा. स्वामी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  अमेरिका दौ-यावर गेले. तेव्हाच अमेरिका पाकिस्तान विरोधात महत्त्वपूर्ण निर्णय घेणार हे निश्‍चित होते. यातून पंतप्रधानांची कूटनीती आता प्रत्यक्षात दिसत आहे,  असेही खा. स्वामी म्हणाले.
अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रयस्थान देणारा देश जाहीर केल्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेच्या या निर्णयाचे केंद्रीय गृह राज्यमंत्री  हंसराज अहिर यांनी स्वागत केले आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना आर्थिक मदत व आश्रय दिला जातो, ही बाब जगजाहीर आहे. आतापर्यंत ही गोष्ट भारत म्हणत  होता आणि आता अमेरिकेनेही ते मान्य केले आहे, असेही अहिर म्हणाले.