Breaking News

सैनिकाचा खून करुन नांदेडमध्ये लपलेले दोघे पोलिसांच्या ताब्यात

नांदेड, दि. 20, जुलै - राजस्थानमध्ये एका सैनिकाचा खून करुन नांदेडमध्ये वास्तव्यास आलेले दोन युवक नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी काल रात्री पकडले  आहेत. त्यांना घेण्यासाठी राजस्थान पोलिसांचे पथक नांदेडकडे रवाना झाले आहे.
नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांना प्राप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक के. एस. पठाण, पोलीस  कर्मचारी शेख इब्राहीम, मोहन हाके आणि शंकर मैसनवाड यांनी बाबानगर भागात दोन युवकांना पकडले. त्यांची नावे प्रमोदकुमार हरफुलसिंग (20) रा.जिल्हा सिकर,  राजस्थान आणि राहुलकुमार ब्रिजमोहन (20) रा.जिल्हा सिकर राजस्थान. प्राप्त माहितीनुसार 2 जुलै 2017 रोजी सेवदबडी जि. सिकर या गावचा प्रकाशचंद्र नावाचा  माणूस आसाम रायफलमध्ये सैनिक आहे. तो सुट्टीवर आला होता. आपल्या मित्रांसोबत एका गावाकडे लग्नाच्या कार्यक्रमासाठी जात असताना सेवदबडी या गावाजवळ  एका हॉटेलमध्ये जेवण करताना जेवणाच्या ताटात कमी आलेले सलाद यावरुन त्यांची आणि हॉटेल मालकाची वादावादी झाली. या वादातून आसाम रायफल्सचा  जवान प्रकाशचंद्र व त्याच्या मित्रानी आपल्या हातातील जेवणाचे ताट फेकून दिले. ते ताट हॉटेलमध्ये येणार्या काही युवकांच्या पायाजवळ गेले आणि त्यातून वाद  झाला. प्रकाशचंद्र आणि त्याचे मित्र आणि दुसरा युवक गट यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत प्रकाशचंद्रचा जागीच मृत्यू झाला. राजस्थान पोलिसांनी त्यावेळेस  काही युवकांना ताब्यात घेतले होते. पण त्याबाबत सविस्तर माहिती प्राप्त नाही. त्याच घटनेतील दोन युवक खुन करुन नांदेडला आले आणि येथे वास्तव्य करीत  आहेत. या माहितीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना पकडले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याबाबतची सविस्तर माहिती राजस्थान पोलिसांना दिली आहे.  राजस्थानचे पोलीस पथक नांदेडकडे रवाना झाले आहे. खुन करुन 16 दिवसाच्या आत दुसर्या राज्यात येवून वास्तव्य करणार्या युवकांना अटक करणर्या पोलीस  पथकाचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी कौतूक केले आहे.