Breaking News

कोपर्डे हवेलीतील धोकादायक पाण्याची टाकी जमिनदोस्त

कोपर्डे हवेली, दि. 20 (प्रतिनिधी) : पिण्याच्या पाण्याची येथील जुनी साठवण टाकी कालबाह्य झाल्याने धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने ही टाकी जमिनदोस्त  करण्यात आली. सध्या गावाला चोवीस तास योजनेच्या साठवण टाकीतून पाणी पुरवठा केला जात आहे.
कोपर्डे हवेली येथील जुनी नळ पाणी पुरवठा योजना 9 जानेवारी 1985 मध्ये कार्यन्वित करण्यात आली होती. लोकसंख्याच्या तुलनेत ही योजना पुर्ण क्षमतेने पाणी  पुरवठा करु शकत नव्हती. याशिवाय टाकी धोकादायक बनली होती. टाकीच्या खांबाचे सिमेंट निघाले होते. लोखंडी सळ्या गंजल्या होत्या. ठिकठीकाणी गळती  लागली होती. त्यामुळे टाकी कधी कोसळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
टाकीनजीक रस्ता असल्याने ग्रामस्थांची वर्दळ होती. टाकी कोसळल्यास जिवितहानी होण्याची शक्यता असल्याने टाकी पाडण्याचे आदेश जीवन प्राधिकरणच्या  कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामपंचायतीला दिले होते. त्यानंतर काही दिवस ग्रामपंचायतीने टाकीला फलक लावुन सुरक्षात्मक उपाययोजना केली. अखेर सोमवारी  ग्रामपंचायतीने ही धोकादायक टाकी पाडली. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होवू नये, यासाठी चोवीस तास योजनेचे पाणी पुर्ण क्षमतेने देण्यास सुरवात  केली आहे. चोवीस तास योजनेतील टाकीची साठवण क्षमता 4 लाख लीटर असून 1 हजार 20 ग्रामस्थांनी मीटर जोडणी करुन घेतली आहे. शुध्द आणि मुबलक  पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, जुन्या नळ पाणी पुरवठा योजनेला 2 वीज पंपांचा तर बेघर वसाहतीत एका पंपाचा वापर करण्यात येत होता. तिन्ही विज पंपाचे प्रती महिन्याचे बिल पन्नास  हजार रुपये येत होते. सध्या हे वीजेचे पंप बंद झाल्याने आणि नवीन योजना सुरू झाल्याने ग्रामपंचायतीची 50 हजार रूपयांची बचत होणार आहे.