Breaking News

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार  रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला. रामनाथ कोविंद यांना 66 % म्हणजेच 7 लाख 2 हजार 44 मतं मिळाली,  तर मीरा कुमार यांना 34 % म्हणजेच 3 लाख 67 हजार 314 मतं मिळाली. रामनाथ कोविंद हे येत्या 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. आज सकाळी 11  वाजता, संसद भवनाच्या हॉल क्रमांक 62 मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली.
एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे मतमोजणीत सुरुवातीपासूनच पुढे होते. पहिल्या फेरीत रामनाथ कोविंद यांना 60 हजार 683 मतं मिळाली. तर मीरा कुमार  यांच्या पारड्यात 22 हजार 941 मतं पडली. या निवडणुकीत 21 खासदारांची मतं बाद झाली आहेत.
राष्ट्रपतीपदी एनडीएचे रामनाथ कोविंदच विराजमान होतील, हे जवळपास स्पष्ट होतं. 776 खासदार आणि 4 हजार 120 आमदारांच्या एकूण मतांचं मूल्य 10 लाख  98 हजार 882 इतकं होतं आणि विजयासाठी कोविंद यांना फक्त 5 लाख 49 हजार 442 मतं गरजेची होती. एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना 539  खासदारांचं म्हणजेच तब्बल 64 टक्के मतं  मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यापेक्षा दोन टक्के अधिक, म्हणजेच 66 टक्के मतं त्यांना मिळाली. तर मीरा  कुमार यांना 229 खासदारांचं म्हणजेच सुमारे 36 टक्के पाठबळ मिळण्याचा अंदाज होता, मात्र त्यांना दोन टक्के मतं कमीच मिळाली.