Breaking News

सांगलीत 22 जुलैला राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन

सांगली, दि. 20, जुलै - रौप्य महोत्सवी वर्षात पर्दापण करणार्या वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने शनिवार दि. 22 जुलै रोजी  राज्यस्तरिय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक शशिकांत राजोबा यांनी दिली.
सांगली- माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात ही राज्यस्तरिय सहकारी परिषदेत होणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या  अध्यक्षतेखाली होणार्या या सहकार परिषदेत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष  काका कोयटे, आमदार सुधीर गाडगीळ व सांगली जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर आदी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे नागरी  सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयापासून सहकार फेरी, वीराचार्य कोअर बँकिंगचा शुभारंभ व मिनी एटीएम सेवेचे उदघाटन सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात येणार  आहे.
या सहकार परिषदेत सहकार क्षेत्रातील सद्यस्थितीवर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे ज्येष्ठ  संचालक राजुदास जाधव, सुदर्शन भालेराव, शांतीलाल शिंगी, दादाराव तुपकर, संग्राम पाटील, सागर चौगुले, सांगली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे  अध्यक्ष विवेक गुळवणी, कर्मवीर मल्टीस्टेट सोसायटीचे प्रा. डी. ए. पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील व वीर सेवा दलाचे अध्यक्ष  अरविंद मजलेकर आदी सहभागी होणार आहेत.