Breaking News

सांगली महापालिकेतील भाजपच्या दोघा नगरसेवकांचे पद रद्द

सांगली, दि. 20, जुलै - सांगली महापालिकेतील विरोधी स्वाभिमानी विकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या युवराज बावडेकर व श्रीमती  स्वरदा केळकर या दोन नगरसेवकांचे पद तीन वर्षासाठी रद्द करण्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत. याबाबत स्वाभिमानी विकास  आघाडीचे तत्कालीन गटनेते शिवराज बोळाज यांनी या दोन नगरसेवकांना अपात्र ठरविण्याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेत शिवराज बोळाज  यांच्यावतीने अ‍ॅड. अमोल चिमाण्णा यांनी काम पाहिले.
महापालिकेची गत पंचवार्षिक निवडणूक शिवसेना, भाजप, जनता दल व अपक्ष अशा सर्वांनी एकत्र येऊन स्वाभिमानी विकास आघाडीच्यावतीने लढवली होती. त्यात  युवराज बावडेकर व श्रीमती स्वरदा केळकर यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या चिन्हावर विजय प्राप्त केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी विकास  आघाडीचे नेते माजी आमदार संभाजी पवार यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी या दोघा नगरसेवकांनी भाजपात राहणे पसंत केले. त्यातून या दोघांनीही  स्वाभिमानी विकास आघाडीविरोधात आपली भूमिका कायम ठेवली.
ऑगस्ट 2016 मध्ये स्थायी समिती सदस्य निवडीतही या दोघांनी स्वाभिमानी विकास आघाडीविरोधात भूमिका घेतली होती. राज्य निवडणूक आयोगाने स्वाभिमानी  विकास आघाडीची मान्यता रद्द केल्याने स्थायी समितीच्या दोन जागा रिक्त ठेवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यावेळी स्वाभिमानी विकास आघाडीने उच्च  न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थायी समिती सदस्याच्या निवडी झाल्या होत्या.
या सर्व राजकीय घडामोडीनंतर युवराज बावडेकर व श्रीमती स्वरदा केळकर यांचे नगरसेवकपद अपात्र ठरवावे, यासाठी स्वाभिमानी विकास आघाडीच्यावतीने पुणे  विभागीय आयुक्त यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचवेळी युवराज बावडेकर यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत महापालिका आयुक्त यांना पत्र  दिले होते. या पत्रात त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडीचा गटनेता व स्थायी समितीतील एक जागा देण्याची मागणी केली होती.
त्यावर युवराज बावडेकर यांची मागणी स्वाभिमानी विकास आघाडीविरोधी आहे. त्यामुळे महापालिका अधिनियम, उच्च व सर्वोच्च न्यायालयातील निकालाचे दाखले देत  त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी शिवराज बोळाज यांनी केली होती. याशिवाय श्रीमती स्वरदा केळकर यांनी स्थायी समिती सदस्य निवडीवेळी गटनेते यांनी  दिलेल्या नावाला आक्षेप घेतला, त्यांची ही कृतीही स्वाभिमानी विकास आघाडीविरोधी असल्याचे सांगत त्यांचे नगरसेवकपदही रद्द करण्याची मागणी केली होती.
याबाबत चंद्रकांत दळवी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात युवराज बावडेकर व श्रीमती स्वरदा केळकर या दोघा नगरसेवकांना तीन वर्षासाठी अपात्र ठरविण्यात  आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता या दोघांनाही आगामी वर्षभरावर येऊन ठेपलेली सांगली महापालिकेची निवडणूक लढविता येणार नाही. दरम्यान, पुणे  विभागीय आयुक्त यांच्या या निर्णयाबाबत या दोघाही नगरसेवकांनी आपल्याला कोणतीही माहिती मिळालेली नाही अथवा आदेशही प्राप्त झालेला नाही. तसा कोणताही  निर्णय झाला असेल, तर त्याविरोधात योग्य त्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे युवराज बावडेकर व श्रीमती स्वरदा केळकर यांनी सांगितले.