Breaking News

कर्जमाफीमुळे जिल्हा बँकेला मिळणार नवसंजीवनी : पालकमंत्री

बुलडाणा, दि. 29 - बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही आर्थिक अडचणीत असणारी बँक होती.  मात्र नाबार्ड व केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीने बँक अडचणीतून बाहेर यायला लागली. बँकिंगचा परवाना मिळाल्यानंतर बँकेचे व्यवहार सुरू झाले. यावर्षीही बँकेने सीआरएआर 10.84 टक्के एवढा राखून चांगली कामगिरी बजावली आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेला सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. ही कर्जमाफी जिल्हा बँकेला मिळालेली नवसंजीवनी असल्याचे मत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केले.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या सभागृहात कर्जमाफीच्या निर्णयानंतर पहिल्यांदा बुलडाणा शहरात आगमनप्रसंगी पालकमंत्री यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, बँकेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण चव्हाण, नाबार्डचे सुभाष बोंदाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक  श्रोते आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी याप्रसंगी जिल्हा बँकेच्या कृषि कर्ज वितरणाचा आढावा घेतला. शासनाच्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेचे खातेदार असलेला शेतकरी उत्साहित झाला असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, जिल्हा बँक ही खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांची बँक आहे. बँकेच्या अथक परिश्रमामुळे व शेतकर्‍यांनी वसुलीमध्ये दिलेल्या भरपूर सहकार्यामुळे बँक उर्जितावस्थेकडे वाटचाल करीत आहे. लवकरच बँकेला राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत मिळणार असून त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने द्यावयाचे 10 हजार रूपये बँकेमार्फत देण्यात येतील.  
कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री यांचा जिल्हा बँक प्रशासन व कर्मचारीवृंद, जिल्हाधिकारी, उपनिबंधक यांनी सत्कार केला. प्रास्ताविक डॉ. अशोक खरात यांनी केले. ते म्हणाले, बँक प्रशासनाने बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत करण्यासाठी मुख्यालयीन डेटा सेंटर केले आहे. त्याशिवाय डेबीट/क्रेडीट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. या कर्जमाफीचा लाभ बँकेच्या 59 हजार 450 शेतकरी खातेदार सभासदांना होणार आहे. त्यांची 285.94 कोटी रूपयांची कर्जमाफी झाली आहे. तसेच दीड लाखाचे वरील 1870 शेतकर्‍यांचे 35.98 कोटी रूपयांची मागणी बँकेची आहे. या शेतकर्‍यांना 28.05 कोटी  रूपयांची रक्कम प्रत्यक्षात मिळणार आहे. अशाप्रकारे बँकेला या कर्जमाफीच्या निर्णयामुळे 317.53 कोटी रूपयांचा लाभ होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार इथापे यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.