Breaking News

देशी दारूचे दुकान अन्यत्र हलवण्याची भुईंज ग्रामस्थांची मागणी

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : भुईंज येथे महामार्गानजीक असणारे दारुचे दुकान अंतराच्या अटीनुसार बंद झाले आहे. ते किसन वीर कारखाना रस्त्यावर स्थलांतरित करण्यात येत असून त्यास महिला व ग्रामस्थांनी विरोध केला असून याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन ते दुकान अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या निवेदनानुसार भुईंज येथे असणारे देशी दारुचे दुकान महामार्गानजीकच्या अंतराच्या अटीनुसार बंद झाले आहे. ते दुकान आता किसन वीर कारखाना रस्त्यावरील विकसित होत असलेल्या नागरी वस्तीत स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरु आहेत. परंतु हा रस्ता पूर्ण रहदारीचा असून दुकानातील मद्यपी रस्त्यावर येऊन नेहमीच गोंधळ घालतात. याचा प्रत्यय पूर्वीच्या ठिकाणी असलेल्या जागेत ग्रामस्थांना आला आहे. हे मद्यपी अर्वाच्च भाषेत बोलतात. एकमेकांशी वादावादी करतात. त्याचा त्रास तेथून जाणार्‍या महिला व शालेय विद्यार्थ्यांना होत असतो. त्याचबरोबर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर या रस्त्यावरुन उसाने भरलेल्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक अशा वाहनांची वर्दळ वाढणार आहे. अशावेळी मद्यपी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा व अपघाताची शक्यता अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. तसेच या दुकानाशेजारी असणारे शेतकरी व परिसरातील रहिवाशांनी सुरु असलेले बांधकाम होऊ नये, ते गावापासून दूर अन्यत्र स्थलांतरित करावे, तसेच गावातील दारुची दुकाने बंद करावीत, अशीही मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न केल्यास परिसरातील नागरिकांच्या प्रखर विरोधाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.