Breaking News

पावसाच्या संततधारेमुळे कास तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : सातारा शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करणार्‍या कास तलावाची पाणीपातळी वाढू लागली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर असल्याने कास तलाव यंदा लवकर भरेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कास तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी कास तलावाला भेट दिली. दरम्यान, पावसाची संततधारा सुरु असल्याने तलावातील पाणीसाठ्यात वाढ होवू लागली असल्याने सातारकरांवरील पाणी कपातीची वेळ येणार नाही. 
सातारा शहराच्या पश्‍चिम भागाला कास योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. चार दिवसांपूर्वी कास तलावात 5 फूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे मृत पाणीसाठा पिण्यासाठी उचलण्याची तयारी नगरपालिकेने केली होती. वर्षभर योग्य नियोजनाच्या अभावामुळे सातारकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. पाणीपुरवठा विभागाकडून पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांचे हाल झाले. पाणी गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत होता. त्यात दोन्ही पाणी योजना सुरु राहिल्याने पाण्याची जादा मागणी राहिली. याचा मेळ घातला नसल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. पदाधिकार्‍यांना पाणी पुरवठ्याबाबत ज्ञान नसल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली होती. तलावातील शिल्लक पाणीसाठा आणि तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे आता पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही.