मानवसेवा प्रकल्पाच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन वृक्षरोपणाने साजरा
। अमृतवाहिनीचे कार्य कौतुकास्पद सत्यजित तांबे
अहमदनगर, दि. 07 - विविध वंचित घटकांवर काम करणार्या सामाजिक संस्था नसत्या तर जगात अराजकता माजली असती. सामाजिक समतोल साधण्याचे काम या संस्था करत असतात. अशा सामाजिक संघटनांना पाठबळ देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पर्यावरण संतुलन राखण्याबरोबर सामाजिक संतुलन अबाधित ठेवण्याचे अमृतवाहिनी संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडत असताना सजीवसृष्टीचे असतित्व धोक्यात आले असून, वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय नसल्याची भावना युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली.निराधार व वंचित घटकातील मनोरुग्णांसाठी कार्य करणार्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अरणगाव येथील संस्थेच्या आवारात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी तांबे बोलत होते. यावेळी संतोष ठोकळ, जीकेन कंपनीचे व्यवस्थापक संग्राम कदम, मिलिंद जपे, रामकिसन वाळके, कैलास नेहुल, आतिक शेख, संजीव शिंगवी आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तांबे पुढे म्हणाले की, जीवनात वंचित गरजू व्यक्तींना मदत केल्यानेच समाधान व आनंद मिळत असतो. सामाजिक संवेदना समजणे हे मनुष्यपणाचे लक्षण आहे. नाहीतर पशु, प्राणी सुध्दा आपले जीवन व्यतीत करत असतात. जिल्ह्याला सामाजिक चळवळींचा वारसा लाभला आहे. अनेक मोठ मोठे सामाजिक कार्य जिल्ह्यात उभे राहिले असून, विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य चालू आहे. अशा सामाजिक संस्थांना सर्वपरीने सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दिलीप गुंजाळ यांनी संस्थेच्या वतीने मनोरुग्णांसाठी चालू असलेल्या सेवेची माहिती देवून, आजवरच्या प्रवासाचा आढावा घेतला. शिर्डीच्या प्रवासातून मनोरुग्णांसाठी काम करण्याची मिळालेली प्रेरणा त्यांनी विशद केली.