Breaking News

छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील जमीन विक्रीस बंदी

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) : छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनामवर्ग 1 सत्ताप्रकारच्या सर्व जमिनी आणि देवस्थान इनाम हक्काच्या सर्व जमिनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येणार नाहीत. तसेच विजयसिंहराजे भोसले यांनी दाखल केलेल्या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत घराण्याच्या सर्वप्रकारच्या जमिनी विक्री करु नयेत, तसेच त्यावर इतर कोणाचा हक्क निर्माण करु नये, अशी ताकीद दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, न्यायाधिश श्रीमती के. एफ. एम. खान यांनी दिली.
याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूचि बंगल्यावरून दिलेल्या माहितीनुसार विजयसिंहराजे भोसले यांनी सातारा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात 2003 मध्ये दावा दाखल केला आहे. या दाव्यात महाबळेश्‍वर, लिंब, बावधन, बोंडारवाडी, कोडोली, गोडोली, आरफळ यासह छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम वर्ग 1 सत्ताप्रकारच्या सर्व जमिनी आणि प्रतापगड, शिंगणापूर यासह सर्व देवस्थान इनाम हक्काच्या जमिनी छत्रपती घराण्याच्या सामाईक मालकीच्या आहेत, असे जाहीर होवून मिळावे. या जमिनी अहस्तांतरणीय, अविभाजीय आहेत, असे जाहीर होवून मिळावे. या मिळकती सातारा छत्रपती घराण्याच्या सरंजाम इनाम सत्ताप्रकार व देवस्थान इनाम सत्ताप्रकाराच्या सर्व जमिनी उदयनराजे, कल्पनाराजे यांनी महाराष्ट्र शासन व विजयसिंहराजे व त्यांचे बंधू अभयसिंहराजे भोसले, शिवाजीराजे भोसले यांच्या संमतीशिवाय कोणासही विक्री अथवा अन्य प्रकारे तबदील करु नयेत. स्वत: अथवा कुळ, एजंट अगर मुखत्यार मार्फत करु नयेत, अशी ताकीद देण्याची मागणी करण्यासाठी दावा दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी न्या. श्रीमती खान यांच्यासमोर झाली. न्या. श्रीमती खान यांनी विजयसिंहराजे भोसले यांची दाव्याच्या दरम्यानची तुर्तातुर्त ताकीदीची मागणी मंजूर करुन सातारा छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम व देवस्थान इनाम सत्ताप्रकारच्या सर्व जमिनीमध्ये विजयसिंहराजे, दिवंगत अभयसिंहराजे व  शिवाजीराजे भोसले यांना हक्क आहे. सर्व मिळकती शासनाने फॅमिली ग्रँड म्हणून दिल्या आहेत. या मिळकती शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विक्री करता येत नाहीत, असे नमूद करून उदयनराजे व कल्पनाराजे यांना या जमिनी शासनाच्या पुर्व परवानगीशिवाय विकता येणार नाहीत. म्हणून दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत सदर जमिनींची विक्री अथवा जमिनीवर इतर कोणाचाही हक्क निर्माण करु नये, अशी तुर्तातुर्त ताकीद न्यायालयाने दिली आहे.
विजयसिंहराजे यांच्यावतीने अ‍ॅड. दिलीप शिरगावकर-पाटील हे काम पहात आहेत. दरम्यान, न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर या निर्णयासंदर्भात उच्च न्यायालयात अपिल दाखल करण्यासाठी दिलेल्या निर्णयाला दोन महिने स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारा उदयनराजे यांचे वकील अ‍ॅड. राजेभोसले यांचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.