Breaking News

कोयनानगर परिसरात पावसाचे आगमन

कोयनानगर, दि. 2 : महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी कोयना धरण परिसरासह पाटण तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. उन्हाचे चटके सोसणार्‍या जनतेला या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मंगळवारी पहाटेपासूनच पाटण तालुक्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून रात्रंदिवस पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. तर शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोयना धरण परिसरात दिवसभर पावसाची रिमझीम सुरू आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर तो हळूहळू पश्‍चिम महाराष्ट्राकडे सरकू लागला आहे. मान्सूनसाठी अनुकूल वातावरण कोयना परिसरात निर्माण झाले आहे. मंगळवारी पहाटेपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोयना धरण व्यवस्थापनाची पूर नियंत्रण कक्षाची सेवा 1 जूनपासून सुरू झाली आहे. यंदा दोन दिवस अगोदर पावसाचे आगमन झाले. मात्र, किती प्रमाणात पाऊस पडला याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्‍वर, नवजा, कोयना या तीन ठिकाणी 30 मिलीमीटर, नवजा येथे 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 19.54 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणातील पाण्यावर पूर्वेकडील सिंचन व कर्नाटक राज्याला पिण्याच्या पाणी देण्याचे काम सुरू आहे. पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी धरणातून वर्षभरात 32 टीएमसी, कर्नाटक राज्यासाठी 3.02 टीएमसी असा एकूण 35.03 टीएमसी पाणी देण्यात आले आहे. पश्‍चिमेकडील दोन वीज प्रकल्प बंद असल्याने 1320 मेगावॅट विजेचा तुटवडा राज्याला जाणवत आहे. 1 जूनपासून हे प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.