Breaking News

ठेकेदारांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई : आमदार कुलकर्णी

सणबूर, दि. 2 (प्रतिनिधी) : जलयुक्तशिवारची कामे निकृष्ठ केलेल्या ठेकेदार व त्यांंना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करणार असून स्थानिक शेतकर्‍यांच्या तक्रारींचा अहवाल मुख्यमंत्र्याना सादर करणार असल्याचे मत कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले
शिवार संवाद सभे निमित्तने आ. मेधा कुलकर्णी ह्या बनपूरी (ता. पाटण) येथे आल्या होत्या. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाअध्यक्ष भरत पाटील, पाटणचे नगरसेवक सागर माने, तालुका अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी सरपंच शिवाजीराव जगदाळे, प्रमोद पाटील, भगवान पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, भाजप सरकार शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकर्‍यांकडून सरकारच्या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जलयुक्त शिवार योजनेची अमंलबजावनी योग्य पध्दतीने झाली पाहीजे. या दृष्टीने सरकार पावले टाकत आहे. या कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. जर असा कोणताही प्रकार निदर्शनास आल्यास त्या सबंधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकले जाईल. आमच्या सरकारच्या कामाबद्दल लोकांची विश्‍वासहर्ताता वाढली असून राज्यासह सातारा जिल्ह्यात इतर पक्षातील नेते मंडळी भाजपाच्या वाटेवर असून या महिना अखेरीस जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
बनपूरी ग्रामस्थांच्या वतीने शिवाजीराव जगदाळे यांनी स्वागत केले. तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.