Breaking News

जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत गडबड प्रक्रिया थांबवण्याची आमदार जयकुमार गोरेंची मागणी

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) : चुकीच्या पध्दतीने घेण्यात आलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठीची परीक्षा रद्द करण्यात येऊन पुढील प्रक्रिया थांबवावी. अन्यथा न्यायालयात जाणार असल्याचा इशारा बँकेचे संचालक, आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घेण्यात आलेली परीक्षाच चुकीच्या पध्दतीने घेतल्याचा आरोप करत, याविरोधात आपण मुख्यमंत्री व सहकार विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन परीक्षा पध्दतीची चौकशी करण्याचे तसेच तोपर्यंत परीक्षेचा निकाल घोषित न करण्याचे आदेश देण्यात येऊनही निकाल जाहीर केला आहे, असे आमदार गोरे यांनी सांगितले.
आमदार गोरे याविषयी अधिक बोलताना म्हणाले, जिल्हा बँकेने 7 जानेवारी रोजी क्लार्क आणि शिपाई पदाच्या नोकरभरतीची जाहिरात प्रसिध्द केली होती. 376 जागांसाठी सुमारे 13 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. हव्या त्या उमेदवारांना परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळाने एनआयबीइआर या एजन्सीशी संगनमत केले. घेण्यात आलेली परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची होती. उमेदवारांनी अचूक उत्तराच्या पर्यायाला गोल करायचा होता. मात्र उत्तर चुकीचे वाटल्यास पहिल्या उत्तरावर काट मारून पुन्हा दुसरे उत्तर निवडण्याची सुविधा देण्यात आली होती. आपल्या तक्रारीनंतर परीक्षेची संपूर्ण चौकशी करण्याचे तसेच तोपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करू नये, असे आदेश मुख्यमंत्री व सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांना नुकतेच दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने कारवाई करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आमदार गोरे यांनी सांगितले.