उत्तम आरोग्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक - सौ.पिचड
केळी रुह्मणवाडी आश्रमशाळेत वृक्षारोपण; मानवाधिकार संघटनेचा उपक्रम
अकोले, दि. 27 - निसर्ग आपला गुरु आहे. निसर्गाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.वृक्ष लागवडीच्या माध्यमातून आपला निसर्ग आपण वाचवू शकतो. उत्तम आरोग्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे आवशयक असे मत मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा हेमलताताई पिचड यांनी व्यक्त केले.केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील शासकीय आश्रमशाळेत वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अकोले पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा चंद्रकला धुमाळ, मानवाधिकारचे राष्ट्रीय निरीक्षक आबासाहेब देशमुख, माधवराव गभाले, संपर्क अधिकारी बाळा पवार, कार्याध्यक्ष दत्ता जाधव, सरपंच भरत मेंगाळ, प्राचार्य अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना हेमलता पिचड म्हणाल्या की, वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले. त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झालाशेती उत्पन्न घटले, परिणामी शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. झाडांपासून मानवाला ऑक्सिजन मिळतो, झाडांमुळे पाऊस पडतो, मग झाडे जगविली पाहिजे. निसर्गच आपला खरा देव आहे. निसर्ग जपण्यासाठी वृक्षलागवड हा उपक्रम मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून सुरू केला आहे. संपूर्ण तालुकाभर चाळीस हजार वृक्ष लागवड करणार आहोत. एक मुल एक झाडया उपक्रमातून आढळा विभागातील शासकीय आश्रमशाळा केळी-रुम्हणवाडी, शासकीय आश्रमशाळा तिरढे, अनुदानित आश्रमशाळा एकदरे, शासकीय आश्रमशाळा खिरविरे, पिंपरकणे आदी शाळांवर वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केळी रुम्हणवाडी, एकदरे, तिरढे, खिरविरे या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व मानवाधिकार संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.