Breaking News

वाशी एपीएमसीवर शेतकरी संपाचा परिणाम नाही

नवी मुंबई, दि. 02 - शेतक-यांनी आज पासून संप पुकारला असला, तरी वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आज 527 ट्रकटेंपोची आवक,तर 623 ट्रकटेंपोची जावक  झाली आहे. नेहमीपेक्षा 5 टक्के कमी प्रमाणात आवक जावक झाल्यने घाऊक बाजारभावात केवळ 5 ते 10 टक्के फरक पडला.त्यामुळे आज मुंबई व आसपासच्या  उपनगरांना भाजीपाला पुरवठामध्ये कमतरता भासली नाही. 
शेतक-यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी 527 ट्रकटेंम्पो भाजी विक्रीसाठी आल्याने घाऊक बाजारात सकाळी बारापर्यंत विक्रीव्यवहार सुरु होते. यामध्ये आज  परराज्यातून 125 ट्रकटेंम्पो भाजीपाला विक्रीसाठी आला होता. यामध्ये मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश,दिल्लीतून सर्वात जास्त भाजीपाला आला. दुपारपर्यंत 623 ट्रकटेंम्पो  भाजीपाला मुंबई व उपनगरात विक्रीसाठी गेला. त्यामुळे बाजारभावात 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे. मात्र किरकोळ बाजारातील व्यापा-यांनी शेतकरी संपाचा  गैरफायदा घेत आज भाज्यांचे दर 50 टक्क्यांनी वाढविले होते. वाशी येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात दररोज 550 ते 600 ट्रक टेम्पोची आवक होते. मुंबई व  उपनगराला दररोज 1 हजार 800 टन भाजी पाल्याची आवश्यकता असल्याने त्याच प्रमाणात भाजीबाजारातून जावक असते. बाजार आवारात जी आवक होते  त्यामध्ये 100 ते 150 ट्रकटेंम्पो परराज्यातून येतात व 400 ते 450 भाजीपाला महराष्ट्रातून येतो. यामध्ये नाशिक पुणे जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात भाजी विक्रीसाठी  शेतकरी किंवा खरेदीदार पाठवतात. दरम्यान आज संपाचा एपीएमसी मार्केटवर विशेष परिणाम झाला नसला, तरी संप अधिक तीव्र झाल्यावर उद्यापासून फटका  बसण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.