इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : अव्वल मानांकित वॅन-होला नमवून श्रीकांत अंतिम फेरीत
जकार्ता, दि. 18 - इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल असणा-या कोरियाच्या सॉन वॅन-हो याला पराभवाचा धक्का देत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. श्रीकांतने वॅन-होवर 21-15, 14-21, 24-22 असा विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या गेममध्ये श्रीकांतने वॅन-होला मात दिली, तर दुस-या गेममध्ये वॅन-होने श्रीकांतला धूळ चारली. त्यामुळे तिसरा गेम अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला. तिस-या गेममध्ये गुण 21-21 असे असताना श्रीकांतला नेटवर शटल आदळल्याने गुण गमवावा लागला. मात्र, वॅन-होला त्या संधीचे सोने करता आले नाही. श्रीकांतने अप्रतिम खेळ करून पुढील दोन गुण कमावले आणि अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेच्या विजेतेपदासाठी श्रीकांतला आता जपानच्या काझुमासा सकाई याच्याशी झुंजावे लागणार आहे.
