Breaking News

बुलडाणा जिल्ह्यात कडकडीत बंद!

बुलडाणा, दि. 06 - शेतकर्‍यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून परिसरातील शेतकर्‍यांसह विविध पक्ष व संघटनांनी बंदला पाठिंबा दिला. तालुक्यात अनेक ठिकाणी रास्तारोको करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. 
यावेळी सत्ताधार्‍यांविरोधात घोषणा देण्यात आल्या. शेतकर्‍यांच्या  या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.  दरम्यान,आपल्या न्याय मागण्यांसाठी पहिल्यांदाच संपाचे शस्त्र उगारणार्‍या जगाच्या पोशिंद्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प देऊळगाव राजा, देऊळगाव महीसह इतर गावातील बहुतांश नागरिकरांनी केला.
महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर व्यावसायिकांनी या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. ज्या व्यापार्‍यांनी दुकाने सुरू ठेवली होती त्यांना संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन शेतकर्‍यांनी केले. सोमवारी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.  कपड्यांची दुकाने, किराणा दुकाने, स्टोअर्स व इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. येथील चौका पासून शेतकरी व सर्व पक्षीय मोर्चा काढून दुकान सुरू असलेल्या व्यावसायिकांना संपास पाठिंबा देण्याची विनंती केली. या मोर्चात  राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, शिवसंग्राम, स्वाभिमानी संघटनासह इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा संपून गेल्यानंतर शहरातील बहुतांश व्यापार्‍यांनी त्यांच्या दैनंदिन व्यवहारास सुरूवात केल्याचे चित्र शहरात दिसले. तरी ग्राहकांची वर्दळ मात्र बाजारपेठेत कमी होती. रास्ता रोको करुन सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिरात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.