Breaking News

ठाण्याच्या नगरसेवकांकडून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राचा दौरा

ठाणे, दि. 22 - ठाणे महानगरपालिकेच्या विविध संस्थांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेच्या 110 द.ल.लीटर पाणीपुरवठा करणार्‍या  प्रकल्पातंर्गत टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राचा आजसर्वपक्षीय नगरसेवकांनी पाहणी दौरा केला. महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी या दौर्‍याचे आयोजन केले होते.
सर्वसामान्य नागरिकांना सहजरित्या नळातून उपलब्ध होणारे पाणी कुठून व कशाप्रकार उपलब्ध होते याची माहिती घेण्याची उत्सुकता सर्वच नगरसेवकांना होती. या  पार्श्‍वभूमीवर महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे सर्व सदस्यांना उपलब्ध होणारे पाणी त्यावर करण्यात प्रक्रिया, वितरण व्यवस्था आदी माहिती होण्यासाठी टेमघर येथील  जलशुध्दीकरण केंद्राचा पाहणी दौरा महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाचा आयोजित करण्यात आला होता. या दौर्‍यामध्ये पिसे येथे भेट देवून भातसा प्रकल्पातून  उपलब्ध होणार्‍या पाण्याची माहिती घेतली त्यानंतर टेमघर येथील जलशुध्दीकरणाच्या प्रकियेची माहिती प्रत्यक्ष जागेवर जावून घेतली. या पाहणीदौर्‍यात उपस्थित  नगरसेवकांना उपनगरअभियंता रविंद्र खडताळे, कार्यकारी अभियंता विकास ढोले व पांडे व कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. अनेक वेळा  पाणीटंचाईची समस्या भेडसावते, पाणी हे जीवन आहे, ते नक्की विविध प्रक्रिया करुन पिण्यायोग्य पाणी नागरिकांना उपलब्ध करुन देणे ही निश्‍चितच तारेवरची कसरत  आहे अशा प्रतिक्रिया यावेळी नगरसवेकांनी व्यकत केल्या. नगरसेवक म्हणून काम करीत असताना नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या सेवासुविधांबाबत किंबहुना प्रकल्पांची  लोकप्रतिनिधी म्हणून माहिती असणे आवश्यक असल्याने अशा प्रकारच्या पाहणी दौर्‍याचे आयोजन केले असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले.