Breaking News

2024 पर्यत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक असणार

नवी दिल्ली, दि. 22 - 2024 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक असणार आहे, असा अंदाज संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालातून व्यक्त केला आहे. तर  2030 पर्यंत भारताची लोकसंख्या दीडशे कोटींपर्यंत पोहोचणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विषयक विभागाने 2017  मधील लोकसंख्येची समीक्षा करुन अहवाल तयार केला आहे. 
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 19 टक्के लोक चीनमध्ये राहत आहेत, तर 18 टक्के लोक भारतात राहतात. आता चीनची लोकसंख्या 141 कोटी इतकी असून  भारताची लोकसंख्या 134 कोटी इतकी आहे,अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.संयुक्त राष्ट्राकडून लोकसंख्येबाबतचा हा  अंदाजाचा 25 वा अहवाल आहे. यापूर्वी 24 वा अहवाल संयुक्त राष्ट्राकडून 2015 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये भारत 2022 मध्येच चीनला मागे  टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. नव्या अहवालानुसार भारत 2024 च्या आसपास चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकू शकतो.
2024 मध्ये भारत आणि चीनची लोकसंख्या 144 कोटी इतकी असणार आहे. त्यानंतर 2050 सालापर्यंत भारताची लोकसंख्या 166 कोटी इतकी प्रचंड असेल. तर  चीनची लोकसंख्या 2030 पर्यंत स्थिर होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्राने व्यक्त केला आहे.