Breaking News

नवोदित विद्यार्थ्यांचे लेझीम, ढोल पथकासह औक्षणाने जंगी स्वागत

अहमदनगर, दि. 17 - श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी लेझीम, ढोल पथकासह नवोदित विद्यार्थ्यांचे औक्षण करुन जंगी स्वागत करण्यात आले. गुरुवार पासून सुरु झालेल्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी धमाल केली. 
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका वीणाताई बोज्जा, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे शरद क्यादर, अरविंद चन्ना, प्राथ. मुख्यध्यापिका विद्या दगडे, माध्य. मुख्यध्यापक शशीकांत गोरे, शाळेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सगुणा श्रीमल आदिंसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  सर्वशिक्षा   अभियानातंर्गत मोफत  पाठ्यपुस्तकांचे  तर  चॉकलेट व  गुलाबपुष्पाचे  वाटप करण्यात आले.  प्रास्ताविकात मुख्यध्यापिका विद्या दगडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. शरद  क्यादर  यांनी  शैक्षणिक गुणवत्ते  बरोबरच  कला,  क्रीडा क्षेत्रात  लक्ष  केंद्रित करण्याचे आवाहन केले. वीणा बोज्जा  म्हणाल्या की, श्रमिक कामगारांची  मुले येथील मार्कंडेय  शाळेत शिक्षण घेत असताना,  आपली गुणवत्ता सिध्द करत आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नसून,  परिस्थिती बदलण्याची शक्ती शिक्षणात आहे. विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे  यश संपादन करण्याचे त्यांनी आवाहन केले. आभार शशीकांत गोरे यांनी मानले.