Breaking News

तरुण बळाचे रुपांतर मानव संसाधनात करणार : मुख्यमंत्री


नागपूर,दि.26 : कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून दहा हजार युवकांना करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल. हे केंद्र नागपूरसाठी वरदान ठरणार असून मोठ्या प्रमाणात युवावर्गाला कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून ती केवळ लोकसंख्या न राहता या तरुण बळाचे रुपांतर मानव संसाधनात करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर येथे मेडीकल चौकातील स्पंदन सभागृहात एचडीएफसी बँक, फ्लुअल व ओरियन एज्युटेक संस्थेच्यावतीने आयोजित करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. प्रमुख पाहुणे मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी, आमदार डॉ. आशिष देशमुख, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख, प्रसिध्द चित्रपट निर्माते सुभाष घई, एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी नुसरत पठाण, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, भंडार्‍याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, ओरियनचे संचालक मनिष अग्रवाल, फ्लुअलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन देशपांडे, ओरियन एज्युटेकचे संचालक संजीव कोठारी यांची मंचावर उपस्थित होती. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, अशाच प्रकाचे केंद्र अमरावती येथे सुरु झाले आहे. राज्यातील सर्व जिल्हयात अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कौशल्य विकास हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. देशातील 65 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतील तर 50 टक्के लोकसंख्या 25 वर्षाच्या आतील आहे. एवढया मोठया प्रमाणात असलेल्या युवा वर्गाला कौशल्य प्रशिक्षण मिळाल्यास ही केवळ लोकसंख्या न राहता ती मानव संसाधन होईल. ही लोकसंख्या मानव संसाधनात परिवर्तित झाल्यास आपला देश समृध्द तर होईलच सोबत जगातील इतर देशाला मानव संसाधन देण्याचे काम देखील यामधून होणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक सुभाष घई यांच्या संस्थेसह विविध संस्थांशी कौशल्य विकासाबाबतचे सामंजस्य करार करण्यात आले. कौशल्य विकासाबाबतची माहिती देणारे स्टॉल सभागृहाच्या परिसरात लावण्यात आले होते. नागपूर व भंडारा जिल्हयातील मोठया संख्येने युवावर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता.