आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांसमोर मडकी फोड आंदोलन
सोलापूर,दि.26 : इंद्रायणी आणि चंद्रभागा नदीच्या पाण्याविषयी विविध मागण्यांकरिता आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांसमोर मडकी फोड आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रफुल्ल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टाटाच्या मालकीच्या धरणातील पाणी दुष्काळी भागाला पिण्यासाठी देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा, संभाव्य पाचशे मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या पर्यायी कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाला आदेश द्यावेत, अवजल पाण्याचा लाभ होणार्या भागासाठी पर्यायी सुयोग्य मार्ग सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाला आदेश द्यावेत, कृष्णा खोरे महामंडळाच्या जलआराखड्यामध्ये या मागणी प्रस्तावाचा समावेश करण्याचे आदेश तत्काळ देण्यात यावे आदी नऊ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयासमोर असेच आंदोलन करण्यात येणार असून याची सुरुवात सांगोला येथून होणार आहे, अशी माहिती श्री. कदम यांनी दिली. यावेळी हरिभाऊ यादव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.