Breaking News

वेरुळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जनतेची फसवणूक

औरंगाबाद, दि. 08 - वेरूळ येथील पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जमा झालेल्या लाखो रुपयांवर पोस्टमनने डल्ला मारल्याचे उघड  झाले आहे. याप्रकरणी पोस्टमास्तर बी. डी. रेगुल्वार व क्लर्क गणेश कदम यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. वेरूळचे पोस्टमन राजेंद्र विनायक वरकड  यांच्या निधनानंतर अनेक खातेदारांनी पोस्टात जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्याची पोस्ट ऑफिसमध्ये नोंदच नसल्याने खळबळ उडाली आहे. या पोस्ट  ऑफिसमध्ये अनेक गोरगरीब, मजुरी करणारे कामगार, पुजारी, व्यापारी तसेच नोकरदार वर्गाने
बचत खाते काढले आहे. या खातेधारकांच्या खात्यात जमा झालेला पैसा खिशात घालून संबंधित खातेदाराला त्याच्या पुस्तकावर सही व शिक्का मारून रवाना केले  जात होते. मात्र, ही जमा झालेली रक्कम पोस्ट ऑफिसला जमा न करता स्वतःच्या खिशात घालण्याचा गोरखधंदा सुरू होता. याप्रकरणी भागवतानंद गिरीजी महाराज  व शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर यांनी औरंगाबाद येथे पोस्टमास्तर जनरल यांची भेट घेऊन माहिती देताच त्यांनी तातडीने दखल घेत सोमवारी वरिष्ठ पोस्ट  अधीक्षकांचे एक पथक वेरुळ येथे रवाना करून सखोल चौकशी सुरू केली. चौकशी अधिकारी खातेदारांचा जबाब नोंदवून घेत आहेत. किती रकमेचा भ्रष्टाचार झाला  याची चौकशी सुरू असून महिना अखेरपर्यंत सत्य काय ते समोर येईल. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये खातेदारांच्या तक्रारी तसेच आर. डी. ची पासबूक जमा करण्याचे  काम सुरू असून पोस्टमास्तरचा तात्पुरता चार्ज जाधव यांना देण्यात आला आहे.
घोटाळ्याचा आकडा कोट्यवधी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोस्टातील घोटाळा उघड होताच अनेकजण पासबूक घेऊन पोस्टात आपले पैसे  सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी गर्दी करीत आहेत.