‘नीट’मध्ये कमी गुण मिळण्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद, दि. 08 - ‘नीट’मध्ये कमी गुण मिळतील या भीतीमुळे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सनी सेंटर पिसादेवी रोड भागात हा प्रकार घडला. अनिकेत पंडित गडकरी असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.अनिकेतचे वडील भोकरदन येथे प्राध्यापक असून, आई शिक्षिका आहे. अनिकेतने गेल्या वर्षी नीटची परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला कमी गुण मिळाल्याने त्याने पुन्हा यावेळी ‘नीट’ दिली. काही दिवसांपूर्वी त्याने ऑनलाइन अँसर की पाहिली. यामध्ये अनिकेतला पुन्हा कमी गुण मिळाले होते. सोमवारी परीक्षा असल्याने आई-वडील बाहेर गेले होते, तर लहान भाऊ क्लासेसला गेला होता. घरी कोणी नसल्याचे पाहून अनिकेतने पंख्याला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे.