Breaking News

सांगली महापालिका निवडणुकीचा रंग चढणार

सांगली, दि. 27 - सांगली महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असली तरी प्रत्यक्षात प्रभाग रचना स्पष्ट झाल्यानंतरच ख-या अर्थाने राजकीय  हालचालींना वेग येणार आहे. यंदा चार सदस्यांचा एक प्रभाग होणार असल्याने प्रभाग आरक्षण व रचना जाहीर झाल्यानंतरच या निवडणुकीला रंग भरणार आहे.
महापालिकेच्या निवडणुका ऑगस्ट 2018 मध्ये होणार आहेत. त्यासाठी मतदारयाद्या अद्ययावत करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच महापालिका  प्रशासनाला केलेली आहे.
मतदार यादी निश्‍चितीनंतर प्रभाग रचना होणार आहे. गतवेळी दोन सदस्यांचा एक प्रभाग होता. मात्र पुढीलवर्षी होणा-या या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग  असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवाराची निवडणूक प्रचारावेळी चांगलीच दमछाक होणार आहे.
आगामी निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरू झाल्या असल्या तरी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता  पक्षाच्या नेत्यांनी गत तीन महिन्यापासून सावध पवित्रा घेतलेला दिसत आहे. काँग्रेसने विकासकामांवर जोर देण्याचा प्रयत्न सुरू केला असून केंद्र व राज्यातील  पध्दतीनुसार महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेससमवेत आघाडी करण्याकडे काँग्रेस नेत्यांचा कल आहे. मात्र या आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते द्विधा  मनस्थितीत असून त्यांच्यात या विषयावरून दोन गट पडले आहेत. एक लोकसभा व दोन विधानसभा सदस्य असलेल्या भाजप नेत्यांची सध्याची भूमिका वेट अँड  वॉच असली तरी येत्या काही दिवसात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नगरसेवकांना भाजपात आणून निवडणुकीचा धमाका करण्यासाठी त्यांचे नियोजन सुरू  आहे.
सध्या मतदारयाद्या अद्यावत करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली असली तरी खरी चुरस प्रभाग रचना स्पष्ट झाल्यानंतर सुरू होणार आहे. जानेवारी  2018 च्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रभाग आरक्षण जाहीर होताच ख-या अर्थाने निवडणुकीला रंग चढणार  आहे. महापालिकेची सध्याची सदस्य संख्या 78 इतकी आहे. त्यात वाढ होण्याची शक्यता असून एक प्रभाग तीन सदस्यांचा, तर उर्वरित 19 प्रभाग चार सदस्यांचे  होतील, अशी चर्चा आहे.