Breaking News

माजी आयुक्त मुंढे यांच्या कार्यकाळात कोटयवधी रुपयांची उद्यानाची विकासकामे मंजूर

नवी मुंबई, दि. 27 - माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात कोटयवधी रुपयांची शहरातील ठिकठिकाणच्या उद्यान संवर्धनाची विकासकामे मंजूर करण्यात  आली होती. विशेष म्हणजे यापूर्वी अनेकदा अंदाजपत्रकीय दरापेक्षा जास्त दराने होणारी कामे मात्र मुंढे यांच्या दरा-यामुळे या अंदाजपत्रकीय दराच्या किंमतीतच  करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
महापालिका आयुक्तांना 5 लाख रुपयांपेक्षा जास्त व 25 लाख रुपयांपेक्षा कमी खर्चाच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार महापालिका अधिनियमानुसार प्राप्त आहेत.  त्यानुसार 26 नोव्हेंबर 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत माजी आयुक्त मुंढे यांनी उद्यान संवर्धन व सुशोभिकरण या बाबतच्या विविध कामांना मंजुरी दिली  होती. 4 कोटी 25 लाख रुपयांच्या या खर्चाच्या कामात उद्यान विकसित करणे, उद्यानात ओपन जिमचे साहित्य बसविणे, खेळणी बसविणे, रस्त्यांतील दुभाजकांचे  सुशोभिकरण करणे, हिरवळ व झाडांची देखभाल करणे आदी कामांचा समावेश होता. त्यामुळे केवळ आपल्याला जुमानत नसल्यामुळे विरोधक होऊन बसलेले मुंढे  यांच्या कार्यकाळात काहीच कामे झाली नसल्याची ओरड करणारे नगरसेवक आता तोंडघशी पडू लागले आहेत.
या आयुक्तांचा दरारा इतका होता की कोणतेही अनावश्यक काम करण्याची कनिष्ठ अभियंत्यापासून ते वरिष्ठ अभियंत्यापर्यंत कोणाची हिंमत होत नव्हती. कारण एखादे  महत्वाचे व मोठे काम मंजुरीसाठी आंले, तर प्रथम आयुक्त स्वत: त्या ठिकाणी जावून त्या कामाची किती आवश्यकता आहे, याची पहाणी करत होते. काही वेळा ते  त्यांच्या दुस-या फळीतील अभियंत्यांकडून त्या कामाची खरोखरच आत्ता गरज आहे का की पूर्वीसारखे नगरसेवकांना वाटले म्हणून एखादे काम काढले जात आहे,  याची ते खातरजमा करत होते. या मध्ये सदर कामाची आवश्यकता नसल्याचे निदर्शनास आले, तर कोणाची धडगत नसल्याचे अधिका-यांना ज्ञात होते. त्यामुळे  नगरसेवकांनी कितीही जबरदस्ती केली, तरी अधिकारी अनावश्यक कामांचा प्रस्ताव तयार करण्याची हिंमत करत नव्हते. अनेकदा दुरुस्तीच्या कामांमध्ये एक मीटर  पदपथ खराब झाले असेल, तर नाहक लगतच्या 2 ते 3 मीटरच्या पदपथाचे काम काढले जात होते. अशा प्रकारे पदपथ दुरुस्ती, पदपथ बनविणे, गटर दुरुस्ती, गटर  बनविणे ही नगरसेवकांची आवडती ‘मलिदा’ देणारी कामे होती. यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच वचक आणला होता. त्यामुळे मुंढे यांच्या कार्यकाळात तरी  ‘फुटपाथ पे फुटपाथ’ म्हणजेच शहराचा विकास का अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली नव्हती.