Breaking News

दिल्ली परिवहन बसमध्ये सीसीटीव्ही लावण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, दि. 22 - महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिल्ली परिवहन महामंडळाच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य  परिवहनच्या सर्व बसमध्ये अद्ययावत तीन कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमे-यातून टिपलेली प्रत्येक हालचाल एका स्क्रीनवर दिसणार आहे. हे प्रत्येक चित्रिकरण  दररोज सायंकाळी महामंडळाच्या नियंत्रण कक्षात पोहोचेल. जर एखाद्याने ॠपॅनिक बटण’ दाबले तर नियंत्रण कक्षात बसच्या आत घडणारी प्रत्येक गोष्ट थेट दिसू  शकेल.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 हजार 350 बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निविदा देण्याचा प्रस्तावही मंजूर  करण्यात आला. या प्रकल्पासाठी सुमारे 140 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महिला सुरक्षेसाठी हा उपक्रम राबवला जाणार असल्याने केंद्र सरकारच्या निर्भया  निधीतून राज्य सरकारला हा निधी मिळणार आहे. निर्भया निधीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर राज्य  मंत्रिमंडळाच्याही मंजुरीचा प्रस्ताव आला होता.