Breaking News

बलात्कार, खूनाच्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर, दि. 29 - अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्या प्रकरणी आरोपीला जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी मरेपर्यंत  जन्मठेपेची सजा सुनावली आहे.विशेष म्हणजे 1988 साली घडलेल्या या घटनेनंतर आरोपी बराच काळ फरार असल्याने तब्बल 30 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल  लागला आहे.जानेवारी 1988 मध्ये राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द मध्ये ही घटना घडली होती.
सिताराम बाबुराव जगताप उर्फ भाऊसाहेब साळवे असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी सिताराम हा कोल्हार येथे एका शेत मालका कडे  नोकरी करून तेथेच रहात होता. 21 जानेवारी 1988 रोजी सायंकाळी आरोपीने मालकाला देवीच्या यात्रेला जाणार असल्याचे सांगून तो तेथून निघाला.जवळच  असलेल्या हेलकरू बाबा मंदिराच्या ओट्यावर आरोपी बसला होता.त्या वेळी शेत मालकाची साडेआठ वर्षे वयाची मुलगी आपल्या भावासोबत मंदिरात दिवा  लावण्यासाठी आली.त्यावेळी आरोपीने मुलीच्या भावाला आपण नंतर घरी घेऊन येतो असे सांगितले.मात्र अंधार पडून गेल्यानंतर उशीरापर्यंत मुलगी घरी आली  नाही.त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली असता मुलगी सापडली नाही.त्यामुळे दुस-या दिवशी 22 जानेवारी रोजी मुलीच्या काकाने राहुरी पोलीस  ठाण्यात मिसींग ची तक्रार दाखल केली होती.त्यानंतर शेत मालक व त्याच्या नातेवाईकांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी संगमनेर तालुक्यातील साकूर येथे  सापडला.पोलीसांनी चौकशी केली असता त्याने मुलीवर बलात्कार करून तिला मंदिराजवळील ज्वारीच्या शेतात मारून टाकल्याची कबुली दिली.पोलिसांनी तपास  केला असता ज्वारी च्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला.तसेच आरोपीची सायकल व त्याच्या शर्टाचे बटण देखील पोलिसांना तेथे मिळाले.त्यानंतर पोलीस  ठाण्यात आरोपीच्या विरूध्द बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास पूर्ण होताच पोलीसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
या घटनेपूर्वी 1987 मध्ये आरोपीने लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील बलात्काराचा एक गुन्हा केला होता.मात्र गुन्ह्यानंतर तो फरार होता.राहुरी पोलिसांनी अटक  केल्यानंतर श्रीरामपूरमध्ये प्रलंबित असलेल्या गुन्ह्याच्या तपासकामी लोणी पोलिसांनी त्याचा ताबा मागितला होता.1987 च्या बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी सिताराम  याला न्यायालयाने 31 ऑगस्ट 1988 रोजी 7 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली होती. आरोपीची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर लोणी पोलिसांना  त्याचा ताबा पुन्हा राहुरी पोलिसांकडे देणे गरजेचे होते.मात्र पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने शिक्षेचा कालावधी संपताच आरोपी सिताराम जेलमधून बाहेर पडला व पुन्हा  फरार झाला.त्यानंतर 2016 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली.या प्रकरणाची सुनावणी अहमदनगरच्या जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात झाली.