शेतकर्यांच्या संपाला वारकरींचा पाठिंबा ; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
। जिल्ह्यात दारुबंदी करण्याची व प्रशासकीय पातळीवर बोअरवेलचे खड्डे बुजवण्याची मागणी
अहमदनगर, दि. 02 - राज्य सरकारकडून कर्ज माफीची घोषणा होत नसल्याने व विविध मागण्यांसाठी शेतकर्यांनी पुकारलेल्या बंदाला वारकरी संप्रदायाच्या वतीने पाठिंबा देवून, ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यात दारुबंदी करण्याची व प्रशासकीय पातळीवर बोअरवेलचे खड्डे बुजवण्याची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.सद्गुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठाण, फिनिक्स फाऊंडेशन व विविध स्वयंसेवी संघटनेच्या पुढाकाराने क्लेराब्रुस मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये जिल्ह्यातील वारकरी मंडळी, स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात मोर्चात सहभागी आंदोलकांनी ठिय्या दिला. यावेळी ह.भ.प. महाराजांची भाषणे झाली. निवेदन घेण्यासाठी शासकीय अधिकारी न आल्याचा वारकरींच्या वतीने उध्दव महाराज मंडलिक यांनी निषेध नोंदवला.
राज्यातील शेतकरी अत्यंत अडचणीच्या काळातून जात असताना, शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत सरकार उदासिन दिसत आहे. रात्रं दिवस शेतकर्यांसह त्याचे कुटुंबीय कबाड कष्ट करत असतात. त्याने पिकवलेल्या शेतमालाला त्याप्रमाणात योग्य भाव मिळत नाही. वेळेवर कर्ज न मिळणे, पुरेशी वीज उपलब्ध न होणे, अवकाळी पाऊस व दुष्काळ असे अनेक प्रश्न भेडसावत असतात. शेती उत्पादनासाठी लागणारे किटकनाशके, खते, बियाणे, किटकनाशके व औजारे यांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, शेतकर्याने पिकवलेल्या शेतमालाचे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी कर्जबजारी झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शेतकर्यांच्या मागण्या योग्य असून, वारकरी शेतकर्यांच्या पाठिशी ठाम आहे. त्यांच्या सर्व मागण्या तातडीने पुर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
राज्यासह जिल्ह्यात बोअरवेलमध्ये लहान मुले पडण्याच्या घटनेत दिवसंदिवस वाढ होत आहे. यामुळे अनेक निष्पाप बालकांना आपले प्राण गमवावे लागत असून, या घटना थांबविण्यासाठी राज्यपातळीवर उपाययोजना करणे करणे अपेक्षित आहे. बोअरवेलमध्ये पडून निष्पाप बालकांच्या मृत्यूस जबाबदार पडलेल्या संबंधीतांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावे. बोअरवेलच्या खड्डयात लहान मुले पडण्याची दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर बोअरवेलचे खड्डे बुजवण्याची कार्यवाही व्हावी. तसेच जिल्ह्याला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभला असून, अनेक तीर्थक्षेत्र आहे. शहर, गांव व तीर्थक्षेत्रामध्ये दारु, जुगार व अवैध व्यवसाय वाढीस लागले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी चोरी, महिलांची छेडछाड, रस्त्यावरील भीषण अपघात, गटातटांमधील वाद होण्यासाठी दारु व अवैध व्यवसाय कारणीभूत ठरत आहे. यासाठी तातडीने संपुर्ण जिल्ह्यात दारुबंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोर्चात सर्वश्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कराळे, ज्ञानेश्वर तांबे, काशीनाथ गोराणे, ज्ञानेश्वर आरोटे, सोमनाथ भोर, संकेत आरोटे, रामनाथ नन्नवरे, निवृत्ती गायके, बाळासाहेब तनपुरे, रखमाजी नाचन, अनिल थोरात, सुनिल थोरात, बाबासाहेब खुळे, प्रकाश आढाव आदिंसह जिल्ह्यातील वारकरी मंडळी उपस्थित होते.