Breaking News

गुणवंत कर्मचार्‍यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात

अकोले, दि. 02 - शासकीय सेवेत असताना आपण ज्या ठिकाणी काम करतो ते कामच आपले स्वतचे समजले तर नक्कीच आपल्या चांगल्या कामाचा उदोउदो जनता करते. मात्र काही कर्मचारी कार्यालयात येवून काम न करता पगारापुरतेच काम करतात. अशा गोष्टींनी वरिष्ठ अधिकारी देखील जबाबदार असतात. चुकीच्या गोष्टींना कधीही महत्व न देणारे या कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांचा सेवापुर्ती गौरव होत असल्याचा आनंद या विभागाचे उपविभागीय अभियंता एन. व्ही. कुलकर्णी यांनी काल जी. आर. बयाणी व वाहन चालक एकनाथ चौधरी यांच्या सोहळयात बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपिठावर शाखाअभियंता मधुकर बिन्नर, श्री. मेटकरी,  हजारे, मोरे, राजू गजरे, पवार, पंचायत समिती शाखा अभियंता श्री. गोल, गजानन पतसंस्थेचे अध्यक्ष गोरख नवले, कॉ. भास्कर खांडगे, पंडीत वाकचौरे, दिलीप शेणकर, जी. आर. फड, दिलीप मंडलिक यासंह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कुलकर्णी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण या कार्यालयामार्फत अकोले तालुक्यातील 32 गाव पाणीपुरवठा, आढळा पाचगाव पाणीपुरवठा, धामणगाव आवारी यासंह प्रत्येक गावोगावात पिण्याच्या पाणीपुरवठा योजना आजही सक्षमपणे चालु आहेत.
आमच्या कार्यालयातील प्रत्येक कर्मचार्‍याने कामावर कधीही हलगर्जीपणा दाखविला नाही. या दोन्ही कर्मचार्‍यांना सेवेत 35 वर्ष पुर्ण होत असून त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा इतरांना प्रेरणादायी नक्कीच ठरेल.
जी. आर. बयाणी व एकनाथ चौधरी या उत्कृष्ट कर्मचार्‍यांचा आज सेवापुर्ती होत असली तरी शासकीय कामात ज्या ज्या वेळी आम्हाला अडचण निर्माण होईल, त्यावेळी नक्कीच त्यांच्या चांगल्या कर्तृत्वाचा आधार आम्हा अधिकार्‍याला लाभेल, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळी दोन्ही कर्मचार्‍यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.