Breaking News

श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने सातारा शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा, दि. 28 - शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी त्यांच्या डोक्यावर पुन्हा नव्याने दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.  हा निर्णय शेतक-यांच्या संपाची चेष्ठा करण्याचाच प्रकार आहे. हा प्रकार तातडीने थांबवून शेतक-यांना कोणतेही निकष न लावता त्यांचा सात बारा कोरा करावा.  शेतीला सिंचनाची सोय करुन कायमस्वरुपी वीज पूरवठा करणे. शेत मालाला हमी भाव देणे, शेतक-यांची पिळवणूक थांबवणे, यासाठी शेतक-यांच्या नियंत्रणाखाली  प्रक्रिया उद्योग उभारण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. आदी मागण्यांसाठी आज श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने सातारा शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी केले होते. त्यांच्या सोबत या मोर्चात डॉ. प्रशांत  पन्हाळकर, जयंत निकम, मोहनराव यादव, दिलीप पाटील, राजेंद्र भगत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
शेतक-यांना कर्ज नको, वीना अट संपूर्ण कर्ज मुक्ती करावी, व कष्टकरी शेतक-यांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ येवू नये म्हणून पर्यायी विकास निती या  धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी या मोर्चाव्दारे करण्यात आली.