Breaking News

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु

दोन दिवसात 4 टीएमसीने पाणी साठ्यात वाढ

पाटण, दि. 28 : पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने दमदार सुरुवात केली आहे. कोयनानगर येथे संततधार असल्यामुळे गत दोन दिवसात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात 4 टीएमसीने वाढ झाली. सध्या धरणात 22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे नवजा गावच्या हद्दीत असणारा ओझर्डे धबधबा कोसळू लागला आहे. सडावाघापूर पठारावरील सह्याद्रीच्या उंच कड्यावरून कोसळणारा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे.
मान्सूनच्या पावसाने पाटण तालुक्यात पंधरा दिवस उशिरा हजेरी लावली. रविवारअखेर जलाशयात 16.93 टीएमसी पाणीसाठा होता. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली असल्याचे  चित्र पहावयास मिळत आहे. सध्या धरणात 22 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाटण तालुक्यातील नवजा गावच्या हद्दीतील ओझर्डे धबधबा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. फेसाळत पडणारे पाणी अंगावर घेण्यासाठी पर्यटकांची कोयनानगर परिसराकडे गर्दी वाढू लागली आहे. तसेच सडावाघापूर येथील सह्याद्रीच्या कडेपठारावरून कोसळणारा उलटा धबधबा हा पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी सातारा-सांगली जिल्ह्यातील पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे.