Breaking News

शहीद संदीप जाधव यांच्या पत्नीस नोकरी व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणार - पंकजा मुंडे

औरंगाबाद, दि. 29 - मायभूमीचे रक्षण करतांना जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टर मध्ये वीरमरण प्राप्त झालेले शहीद संदीप जाधव यांच्या मुळ गावी केळगांव ता. सिल्लोड  येथील घरी जावून ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हुतात्मा संदीप जाधव यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
या दु:खद प्रसंगात सरकार जाधव कुटूंबियांच्या पाठीशी असून शहीद संदीप जाधव यांच्या वीरपत्नी उज्वलाताई जाधव यांना वैद्यनाथ सहकारी बँकेत येत्या 1 जुलै  पासून नोकरीत सामावून घेण्यात येईल. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे हुतात्मा जाधव यांच्या मुलगा व मुलगी या दोघांच्या नावाने प्रत्येकी 1 लाख रुपयांची  रक्कम बँकेत मुदत ठेव स्वरुपात ठेवण्यात येईल. दोन्ही मुलांचे शिक्षण स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे करण्यात येईल, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
केळगांव हे सैनिकांचे गाव असून गावक-यांनी याठिकाणी व्यायामशाळेची मागणी केली. त्यावर शहीद संदीप जाधव यांच्या नावाने व्यायामशाळा काढण्यात येईल,  त्यासाठी ग्रामविकास मंत्रालयातर्फे 25 लाखाचा निधी देण्यात येईल, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. सरपंच सोमनाथ कोल्हे यांच्यासह ग्रामस्थ मोठया  संख्येने यावेळी उपस्थित होते.