Breaking News

शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी पवार

सांगली, दि. 29 - सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी मणेराजुरी (ता. तासगाव) येथील शिवाजी शहाजी पवार, तर उपाध्यक्षपदी चिखलहोळ येथील  सुनील पांडुरंग गुरव (ता. खानापूर) यांची बिनविरोध निवड झाली.
शिक्षक बँकेचे अध्यक्ष सदाशिव पाटील व उपाध्यक्ष श्रीमती अर्चना खटावकर यांनी राजीनामा दिल्याने नूतन अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीसाठी सांगली जिल्हा प्राथमिक  शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. सहाय्यक निबंधक आर. जी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीवर विरोधी  शिक्षक संघाच्या थोरात गटातील संचालकांनी बहिष्कार टाकला होता.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी शिक्षक समितीकडून शिवाजी पवार, तर उपाध्यक्षपदासाठी सुनील गुरव यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले.  त्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे आर. जी. कांबळे यांनी जाहीर केले. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष शिवाजी पवार व उपाध्यक्ष सुनील गुरव यांचा शिक्षक  समितीचे राज्य नेते विश्‍वनाथ मिरजकर, राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, सांगली जिल्हा अध्यक्ष सयाजीराव पाटील, किसनराव पाटील, बाबासाहेब लाड,  शशिकांत भागवत व सतीश पाटील यांनी सत्कार केला.