Breaking News

कपिल मिश्रा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस

नवी दिल्ली, दि. 27 - दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने माजी मंत्री कपिल मिश्रा यांना नोटीस बजावून सरकारी बंगला रिकामा करण्यास सांगितले आहे. मिश्रा हे आता मंत्री नाहीत. त्यामुळे यापुढे ते सरकारी बंगल्यात राहू शकत नाहीत, असे एका वरिष्ठ सरकारी अधिका-याकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग सत्येंद्र जैन यांच्याकडे असून मिश्रा हे अनेक दिवसांपासून जैन यांच्यावर आरोप करत आहेत.
मिश्रा यांना 6 मे रोजी त्यांच्या पदावरुन हटविण्यात आले होते. मंत्री पदावरून हटविल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला 15 दिवसांच्या आत सरकारी बंगला रिकामा करावा लागतो. नियामांनुसार मिश्रा हे आता पदावर नसल्यामुळे या बंगल्यात राहू शकत नाही. त्यामुळे त्यांना बंगला रिकामा करावा लागेल, असे अधिका-याकडून सांगण्यात आले.