Breaking News

राजधानी,शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांचा चेहरामोहरा बदलणार

नवी दिल्ली, दि. 27 - रेल्वे मंत्रालयाने राजधानी आणि शताब्दी या एक्स्प्रेस गाड्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबरपासून या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या गाड्यांमध्ये जेवणासाठी, प्रवाशांच्या मनोरंजनासाठी, प्रवास सुखकर करण्यासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये 15 राजधानी आणि 15 शताब्दी एक्स्प्रेसचे रुप पालटणार आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च केले जाणार असून ऑक्टोबरपासून सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेने ‘सुवर्ण उपक्रम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुवर्ण उपक्रमांतर्गत या एक्स्प्रेस गाड्यांधील अंतर्गत रचना आणखी आकर्षक केली जाणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, गाड्यांमधील साफसफाई, ट्रेन वेळेवर सोडणे यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच एक गणवेशातील कर्मचारी ट्रॉलीवर जेवण घेऊन येणार आहे. राजधानी आणि शताब्दी ट्रेनमधील अस्वच्छता, गाडी उशीराने येणे अशा तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेसाठी रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेतली जाणार आहे.