Breaking News

रस्ता वर्गचा ठराव रद्द करा; दारूबंदी आंदोलनाची मागणी

अकोले, दि. 29 - अकोले नगरपंचायतीने मागील बैठकीत रस्ता वर्ग करण्याचा ठराव रद्द करणे सहज शक्य असताना जिल्हाधिकारी मार्गदर्शनाच्या नावाखाली नगराध्यक्ष यांनी टाळाटाळ केली. परंतु 14 नगरसेवकांनी जनभावनेचा आदर करीत एकत्र येवून ठराव रद्द करण्याचे निवेदन देवून नगराध्यक्षांची टाळाटाळ उघड केली. नगरसेवकांच्या या निवेदनाने जनतेच्या बाजूला कोण व दारूवाल्यांच्या बाजूला कोण हे स्पष्ट झाले. तेव्हा आता तरी या 14 नगरसेवकांच्या निवेदनाच्या आधारे 29 जूनच्या बैठकीत हा ठराव रद्द करावा अशी मागणी दारूबंदी आंदोलनाने केली आहे.
जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन आता तरी नगरपंचायतीला मिळाले असेल व आता कोणतीही सबब न सांगता नगराध्यक्ष ठराव रद्द करण्यात पुढाकार घेतील अशी आम्ही आशा करतो असे आंदोलनाने म्हटले आहे. ही टाळाटाळ उघड करून जनभावनेचा आदर करीत ज्या 14 नगरसेवकांनी स्वतंत्र भूमिका घेवून रस्ता वर्ग करण्याला विरोध केला त्यांचे आंदोलन जाहीरपणे अभिनंदन करीत आहे. त्याचबरोबर प्रमोद मंडलिक या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी यांना 308 कलमखाली हा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला त्यांचेही अभिनंदन करीत आहे.
एकीकडे ठराव रद्द करण्याची ही टाळाटाळ सुरू असताना दुसरीकडे दारूविक्रेते मंत्रालयापर्यंत रस्ता वर्ग करण्याचे प्रयत्न करीत आहेत.
या बैठकीत हा ठराव रद्द न झाल्यास त्यांच्या सोयीसाठीच ही टाळाटाळ सुरू असल्याचा अर्थ अकोल्यातील नागरिक घेतील हे नगरपंचायतीने लक्षात घ्यावे.
रस्ता वर्गला पाठिंबा देणारे नगरसेवक, नगरसेविका यांनी थेट जनतेसमोर येवून गावाला दारूदुकाने का गरजेची आहेत? तरुणपिढीचे त्यात कसे कल्याण आहे? हे जाहीरपणे पटवून द्यावे. दारू दुकाने उघडण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिले नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
या बैठकीत रस्ता वर्ग ठराव रद्द करण्याचा ठराव सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजूर करून व्यसनमुक्त अकोल्यासाठी हातभार लावावा असे आवाहन दत्ता शेणकर, गौराम बिडवे, संतोष मूर्तडक, हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.