Breaking News

कनकापूरात दरोडेखोरांकडून 3 लाखाच्या 12 दुचाकी हस्तगत

संगमनेर, दि. 29 -  तालुक्यातील कनोली रोडवरील कनकापूर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोघांना आश्‍वी पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून सुमारे 3 लाख रूपये किंमतीच्या 12 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. आरोपींनी आणखी किती गुन्हे केले, या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहेत यासह फरार दोघा अट्टल दरोडेखोरांचा पोलिस कसून तपास करीत आहेत. 
पो. नि. राजेंद्र चव्हाण, हवालदार एकनाथ बर्वे, संजय मंडलिक, भारत जाधव, होमगार्ड राजेंद्र साळवे व प्रताप वाघ सोमवारी आश्‍वी परिसरात गस्त घालत होते. ओझर बुद्रुक-कनोली रस्त्यावरील कनकापूर शिवारातील मारूती मंदिरालगत राहणारे रवी पचपिंड यांच्या वस्तीजवळील शेतात पहाटे 2.45 वाजेच्या सुमारास पोलिसांना काही संशयीत हालचाली दिसून आल्या. पो. नि. चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांना 5 ते 6 चोर जीपच्या उजेडात दबा धरून बसलेले आढळून आले. गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने दरोडेखोरांचा पाठलाग करून गणेश बबन सुर्यवंशी (वय 30), रा. हनुमंतगाव, ता. राहाता, मारूती सोमनाथ पवार (वय 20), अशोक इंद्रभान माळी (वय 20), सागर शिवदास माळी (वय 19) रा. ओझर बुद्रुक, ता. संगमनेर या चौघा दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटार सायकल क्र. एम.एच. 17 झेड. 3903, कोयता, चाकू, नायलॉन दोरी व मिर्चीपूड शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. मात्र यातील संतू उर्फ उंबर्‍या माळी (रा. बारागांव नांदुर, ता. राहूरी) व सोमनाथ श्रीरंग बर्डे, (रा. ओझर बुद्रुक) हे दोघे पोलिसांना हुलकावणी देत अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.
दरम्यान पकडण्यात आलेल्या चौघा दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. राजेंद्र चव्हाण या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. चोकशी दरम्यान या चौघांनी अगोदर उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या. 12 मोटार सायकली अहमदनगर येथून चोरून विकल्याची कबूली दिली. या मोटार सायकली त्यांनी अनेक भागातून काढून दिल्या. सुमारे 3 लाख रूपये किंमताचा हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. चोरीच्या दुचाकींचे गुन्हे देखील नगरच्या एमआयडीसी पोलिसात दाखल आहेत. आश्‍वी पोलिसांनी या घटनेचा जलदगतीने तपास लावल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.