Breaking News

व्यसनमुक्त समाजासाठी प्रयत्न करावेत: पिचड

अकोले, दि. 29 - एक जुलैपासून साजर्‍या होणार्‍या  वनमहोत्सवामध्ये  तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांसह संस्था, कार्यालये व शाळांनी सहभागी होवून वृक्षारोपणाबरोबरच त्याचे संवर्धन करावे, त्याचबरोबर आपल्या गावात दारुबंदीसह व्यसनमुक्ती समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.
याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, वनमहोत्सवाच्या निमित्ताने आता प्रत्येक शेतकर्‍यांने आपल्या शेताच्या बांधावर उत्पन्न देणारे आणि पुढच्या पिढीलाही लाभदायक ठरणारे आंबा, चिंच, जांभूळ, फणस, कौठ, चंदन यासारख्या मोठ्या झाडांचे रोपण करावे व त्याचबरोबर त्यांच्या संवर्धंनाचीही जबाबदारी घ्यावी. बांधावर साग, वेळू, बांबू यासारख्या झाडांची लागवड केल्यास शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल.घरातील प्रत्येक महिलेने पाच झाडे लावल्यास हा उपक्रम निश्‍चित यशस्वी होईल असा विश्‍वास पिचड यांनी व्यक्त केला आहे.प्रचंड वृक्षतोड व परिणामी कमी होत चाललेले जंगल, प्रदूषण, नवीन झाडांची थांबलेली लागवड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडुन दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चालले आहे. यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. हिंदू संस्कृतीत झाडांना पूज्य मानले असून त्याची पूजा केली जाते. ही संस्कृती आपण जपली पाहिजे.अकोले तालुका हा डोंगराळ व दुर्गम मात्र निसर्ग सौंदर्यांने नटलेला आहे. आदिवासी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वनौषधी सापडतात. या माध्यमातून त्यांचेही जतन होईल.तालुक्यात पर्यटन वाढीला वाव असून जंगल अधिक प्रमाणात वाढल्यास पर्यटकही आकर्षित होऊन आदिवासी शेतकर्याला अतिरिक्त रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तालुक्यात गड-किल्लयांची संख्या मोठी असून याठिकाणी आढळणारे दुर्मिळ वृक्ष टिकण्याची गरज आहे. या भागात सादडा, हिरडा, बेहडा.आवळा यासारख्या वृक्षांबरोबरच करवंदांच्या जाळ्याही मोठ्या प्रमाणात आहेत. यांचेपासून आदिवासी शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळते. मात्र या झाडांची संख्याही घटत असून याबाबत जनजागृती करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तालुक्यातील प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लावण्याचे आवाहनही पिचड यांनी केले आहे. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संवर्धन कसे करावे याचे माहिती फलकही लावावेत.पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात मद्यपान करण्यास रोखण्याबरोबरच त्याचेकडून वनसंपतीची नासधूस होणार नाही याची खबरदारी स्थानिक नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात दारूबंदी करण्यासाठी तरुण व महिलांनी पुढे यावे व व्यसनाधिनतेकडे मोठ्या प्रमाणात झुकलेल्या तरुणाला त्यापासून परावृत करावे. दारूबरोबरच घुटका, तंबाखू, मावा, सिगारेट, विडी यासारखी व्यसने तरुणांना जडत आहे, यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम घ्यावेत. प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल स्थापन करून गावातील अवैध धंदे व अवैध दारूविक्री थांबवावी. ग्रामरक्षक दलांमध्ये गावातील तरुण महिला, युवती यांनी स्वत:हून सहभाग घ्यावा व भविष्यात एक सजग पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.