Breaking News

महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नवी दिल्ली, दि. 22 - दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर)  तिसरा अंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्याची लगबग होती. तशीच ती महाराष्ट्र सदनातही  बघायला मिळाली. निमित्त होते, महाराष्ट्र सदनात आयोजित तिस-या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे.
कोपर्निक्स मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी योग दिनाचे आयोजन करण्यात आले. ऐस-पैस जागेवर अंथरण्यात आलेली कार्पेट आणि टापटीप  पोशाखांसह अधिकारी- कर्मचारी योगासनाच्या वेशात दिसत होते. पहिल्या रांगेत निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त  लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त इशू संधू आणि त्यानंतर अगदी शिस्तीत व रांगेत बसलेले महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र  परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंचावर मोरारजी देसाई  राष्ट्रीय योगासन संस्थेचे योगा थेरपिस्ट आनंद वर्धन आणि संस्थेचे विद्यार्थी अन्शुल राठी यांनी महत्त्वपूर्ण योगासनांची माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखवली .  योगसानाचे महत्त्व पटवून देताना आनंद वर्धन यांनी यावेळी विविध योगासनांचे फायदेही समजाऊन सांगितले.