Breaking News

येडेश्‍वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती

अकोले, दि. 28 - येडगाव येथील येडेश्‍वर विद्यालयाच्या वतीने लोककल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज जयंती, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन व रमजान ईद साजरी करण्यात आली.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढूनअमलीपदार्थ विरोधात जनजागृती केली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. सोनवणे यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची ओळख करुन दिली. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक एच. आर. थोरात, एस. बी. कसार, एस. ई. अभंग यांनी अंमली पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरूणांनी व्यसनापासून दूर राहणे हेच त्याचे उत्तम चारित्र्य आहे. उत्तम चारित्र्याशिवाय उत्तम चरित्र घडू शकत नाही. आजची तरुणपिढी देशाचा आधार असल्याने तरूणांनी व्यसनापासून अलिप्त रहावे असे आवहान एस. ई. अभंग यांनी यावेळी केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन न करण्याची शपथ देण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस. एम. सोनवणे यांनी रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस. ई. अभंग यांनी केले तर आभार जाधव यांनी मानले.