Breaking News

फ्लॉवरचे बाजारभाव वधारले; शेतकरी समाधानी

अकोले, दि. 28 - आंबेगाव तालुक्यात सध्या फ्लॉवर पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन दिसुन येत आहे.उन्हाळ्यात बहुतांशी शेतकरी वर्गाने विकतचे पाणी आणुन किंवा काही ठिकाणी पाण्याची काटकसर करून फ्लॉवर पिक जगविले. सद्यस्थितीत फ्लॉवरचे बाजारभाव वाढल्याने शेतकरी खुशीत आहे. 
सध्या 10 किलोला 110 ते 120 रूपये बाजारभाव आहे.  सद्यस्थितीत बाजारभाव वाढल्याने शेतकरी खुशीत आहे.गेल्या 15 दिवसापुर्वी फ्लॉवरचे बाजारभाव गडगडले होते.40 ते 60 रूपये दहा किलो याप्रमाणे फ्लॉवरची विक्री होत असल्याने त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा शेतकरी वर्गाचा भागत नाही. शेतकरी वर्गाने एवढे कष्ट घेवुन हे फ्लॉवर पिक जगविले.
परंतु याचा फायदा त्यांना होताना दिसत नाही. उलट फ्लॉवर पिक असेच शेतात सोडुन देण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.शेतकर्‍यांना सध्या कोणी वाली नसल्याचे दिसत आहे. बहुतांशी ठिकाणी वळवाच्या पावसाने फ्लॉवर पिकाची नासधुस झाली. व हे हातातोंडाशी आलेले पिक बाजारभाव गडगडल्याने असेच सोडुन  देण्यात आले. तसेच काही शेतकर्‍यांनी फ्लॉवर पिक गुरांना बर्‍याच ठिकाणी बाजारभाव नसल्याकारणाने चारा म्हणुन वापरात आणले होते.
या पिकाचे  बाजारभाव गडगडल्याने या पिकाने शेतकरी वर्गाची पुर्ती निराशा  झाली होती.बहुतेक ठिकाणी फ्लॉवर पिकाला ड्रीप सिस्टीम करून हे पिक पाण्याची काटकसर करून जगविले. परंतु या पिकाने शेतकर्‍यांना धोका दिला होता. सद्यस्थितीत फ्लॉवरला बाजारभाव वाढल्याने शेतकरी फ्लॉवर पिकाला वेळेवर औषधे, खुरपणी करत असल्याचे दिसुन येते. भविष्यात अजुनही  फ्लॉवरचे बाजारभाव वाढतील अशी शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.